Narayan Rane On Uddhav Thackeray : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील जागा भाजपच्या वाट्याला आली आहे. येथून महायुतीकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा दावा सोडावा लागला. त्यानंतर आता नारायण राणे यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याशी होणार आहे.
शुक्रवारी (१९ एप्रिल) नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४०० हून अधिक जागा जिंकण्याच्या आवाहनाला पाठिंबा देण्याचे आवाहन समर्थकांना केले.
नुकतंच राणे यांच्या प्रचारार्थ प्रचारार्थ मनसेचे नेते रत्नागिरीत दाखल झाले होते. मात्र यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजर नव्हते. दरम्यान, या सभेत बोलताना नारायण राणे यांनी ७ तारखेला पार पडणाऱ्या लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी राज ठाकरे सिंधुदुर्गामध्ये येतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
नारायण राणेंनी राज ठाकरे यांचे आभार व्यक्त करत म्हटले की, मी लोकसभेचा उमेदवार जाहीर झालो आणि माझ्यासाठी सभा आयोजित केली. ते म्हणाले, योगायोग बघा इथं महायुतीची सभा आणि तिकडं उबाठाची जाहीर सभा. मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना…असंच म्हणेल कारण उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं वाटत…., असे म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली होती. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यभरात सभा घेत झंझावात निर्माण करतील, अशी आशा होती.
परंतु, अद्यापपर्यंत राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकदाही महायुतीच्या व्यासपीठावर दिसलेले नाहीत. परंतु, लवकरच राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांची पहिली सभा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ शकते.