भाजप सरकारने फसवणूक केली

आमदार भरणेंच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत अमोल मिटकरी यांचा घणाघात
रेडा –
नाशिक दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणारे स्थान आहे. या ठिकाणीच भाजपने आपण केलेली पापे धुण्यासाठी जाऊन काढलेल्या यात्रेचा समारोप केला; मात्र जनतेची फसवणूक हे पाप मोठे असल्याने बीजेपीच्या सरकारला थेट जनतेने मातीत गाडले पाहिजे, असा घणाघात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केला.

पळसदेव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी बोलत होते यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने, युवक प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत तरंगे, तालुका अध्यक्ष महारुद्र पाटील, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष स्वप्निल सावंत, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संजय सोनवणे, रत्नाकर मखरे, बाजार समितीचे संचालक शिवाजी इजगुडे, वडार पॅंथर संघटनेचे प्रमुख दयानंद इरकल, रवी भाळे, संजय कुचेकर, गफूर सय्यद यांच्यासह हजारो मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमोल मिटकरी म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेससोडून कित्येक वजनदार नेते गेले; मात्र मी राज्यात फिरतोय, तरुणांचे पाठबळ राष्ट्रवादीच्या मागे मोठ्या संख्येने आहे. हे तरुणांचे पाठबळ भाजपकडे नाही, त्यामुळे उद्याचा मुख्यमंत्री-गृहमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचा असेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

 

“उद्धवा अजब तुझे सरकार’
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रीपदाचा चार्ज सांभाळतात, तरीदेखील मागील 20-25 वर्षांपेक्षा जास्त जातीय तणाव भाजप सरकारच्या काळात झालेला दिसतोय, हे मी बोलत नाही तर संबंधित खात्याचा रिपोर्ट बोलतोय. शिवसेना तर म्हणते 10 रुपयांत जेवण देणार, जर तुम्ही दहा रुपयात जेवण देणार असाल तर सार्वजनिक स्वच्छतागृहात जाताना सात रुपये भरावे लागतात.त्यामुळे हे दहा रुपयाचे जेवण जनतेला परवडेल की नाही, असे म्हणत “उद्धवा अजब तुझे सरकार’ असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला.

पुणे जिल्हा मध्यवर्ती पीडीसी बॅंक ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. त्यामुळे ही बॅंक अजित पवार यांच्या ताब्यात असल्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. तसेच या बॅंकेचा मी संचालक आहे. त्यामुळे ज्या सोसायट्यांना सचिव बदलायचे असतील त्यांना परवानगी तात्काळ दिली जाईल, हा शब्द दत्ता भरणे यांचा आहे, त्यामुळे बॅंकेच्या माध्यमातून कोणत्याही शेतकऱ्याला त्रास होणार नाही.

– दत्तात्रय भरणे, आमदार

Leave A Reply

Your email address will not be published.