फुरसुंगी येथील सभेत संजय जगताप यांचा आरोप

राज्यमंत्र्यांच्या कारभारामुळे “पुरंदर-हवेली’चे नाव खराब

फुरसुंगी – गेली दहा वर्षे पुरंदर-हवेलीचे राज्यमंत्री विजय शिवतरे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांनी भ्रष्टाचारामध्ये पुरंदर-हवेलीच्या जनतेचे नाव खराब केले, असा आरोप संजय जगताप यांनी केला. पुरंदर-हवेली मतदारसंघाचे महाआघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांच्या प्रचारार्थ फुरसुंगी (ता. हवेली) येथे प्रचार सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, अशोक टेकवडे, संभाजी झेंडे, डॉ. दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे, संजय जाधव, अशोक शिंदे, संदीप बांदल, अर्चना कामठे, सचिन घुले आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
डॉ. दिगंबर दुर्गाडे म्हणले की, आघाडीत बिघाडी नाही. तेव्हा यश आपलेच आहे. सुदाम इंगळे म्हणाले की, शिक्षण संस्था उभ्या करणार होते त्याचे काय झाले याचे उत्तर दिले पाहिजे.

तर संभाजी झेंडे म्हणाले की, केंद्रात व राज्यात चुकीचे सरकार असल्यामुळे ईडीच्या माध्यमातून सरकार लांच्छनास्पद कारवाया करीत आहे, असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्योधन कामठे तर सुहास खुटवड यांनी आभार मानले.

संजय जगताप म्हणाले की, पुरंदरमध्ये गेले की, गुंजवणीचे पाणी आणतो हवेलीमध्ये आले की तुमचा पिण्याचा पाण्याचा, कचरा डेपोचा प्रश्‍न सोडवतो, अशा थापा मारायचे काम शिवतारे यांनी केले आहे. फुरसुंगीसह हवेलीतील इतर गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, कचरा डेपो, रस्ते यासारखे अनेक प्रश्‍न राज्यमंत्र्यांना सोडवता आले नाहीत. राज्यमंत्र्यांनी सातत्याने फुरसुंगीच्या पिण्याच्या पाण्याच्या या योजनेचे भूमिपूजन करतो म्हणून सातत्याने तारखा बदलत राहिले व फुरसुंगीच्या जनतेला त्यांनी फसवून थापा मारायचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना घरी पाठवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कॉंग्रेसमध्ये “इनकमिंग’
फुरसुंगी येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने कॉंग्रेसमध्ये “इनकमिंग’ सुरू आहे. अनिल निंबाळकर, प्रमोद निंबाळकर, निलेश निंबाळकर, दीपक निंबाळकर, अजिंक्‍य निंबाळकर, हनुमंत टिळेकर यांनी शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. संजय जगताप यांनी त्यांचे स्वागत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.