पिंपळे सौदागर, (वार्ताहर) – रहाटणी-पिंपळे सौदागर हा परिसर गावठाण व सोसायटी बहुल भाग आहे. या परिसरात घरून काम करणार्यांची संख्या जास्त असून सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील सुरू आहेत. त्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा महावितरणने सुरळीत करावा, अशी मागणी माजी नगरसेवक नाना काटे यांनी केली आहे.
काटे यांनी महावितरणला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरातील रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. उकाड्यामुळे नागरिकांचे बेहाल होत आहेत. योग्य क्षमतेने वीजपुरवठा होत नसल्यामुळे व्होल्टेज कमी-जास्त झाल्यामुळे विजेवर आधारित उपकरणे ना दुरुस्त होतात. यामुळे लहानांपासून थोरांपर्यंत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हाला त्यांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. तसेस भागातील एखाद्या ठिकाणी खोदकाम करताना केबल डॅमेज झाल्यास लवकरात-लवकर दखल संबंधित अधिकारी व कामगाराकडून घेतली जात नाही. ही खूप गंभीर बाब असून, याची दखल घेण्यात यावी. रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरात महावितरणच्या तक्रारीचे लवकरात लवकर निराकरण करून विजेचा लंपडाव थांबवावा, अशी मागणी काटे यांनी केली आहे.