शरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष

गणेश घाडगे

नेवासा  – वर्षानुवर्षे शरद पवारांच्या आश्रयाने राजकारण करून मोठे झालेले अनेक बडे नेते जुने सवंगडी राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता जाताच व आता लवकरच सत्तेत येणार नसल्याचे जाणवल्याने तसेच पक्षाकडून होणारा अन्याय सहन होत नसल्याचे सांगत पक्षाला रामराम ठोकून जात आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सध्या ही पडझड रोखण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आहे. ते उद्या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्वाभिमानाच्या मुद्यावर कॉंग्रेसमधून बाहेर पडून निर्माण झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाटचाल जवळपास वीस वर्षांची झाली आहे. या वीस वर्षांपैकी पंधरा वर्षे राष्ट्रवादी केंद्र आणि राज्यात सत्तेत राहिलेली आहे. सत्तेत असो किंवा नसो चर्चेत राहणे हे पवारांना जितके जमले, तितके बहुधा कोणाला जमलेले नसावे, अशी देखील चर्चा आहे. परंतु 2014 मध्ये आलेल्या मोदी लाटेने कॉंग्रेससह राष्ट्रवादीची देखील धूळधाण उडवली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोदी त्सुनामीने, तर दोन्ही कॉंग्रेसचा पायाच खिळखिळा केल्याचे दिसून आले.

दोन लोकसभा आणि मागील विधानसभा निवडणकीत झालेली पक्षाची वाताहात पाहून राष्ट्रवादीचे अनेक शिलेदार सरदारांची झोप उडाली आणि अनेकांनी आपली संस्थाने खालसा होण्याधीच भाजपा किंवा शिवसेनेच्या आश्रयाला जात शरणागती पत्कारल्याचे दिसून आले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर नेवासे तालुक्‍यात माजी आमदार शंकरराव गडाख, नुकतेच अकोलेचे माजी आमदार मधुकर पिचड, आमदार वैभव पिचड यांनी पवारांची साथ सोडली, तर नगरचे आमदार संग्राम जगताप, श्रोगोंद्याचे आमदार राहुल जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजूषा गुंड, पारनेरचे सुजित झावरे बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत.

नेवाशाचा किल्ला मात्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे एकाकी लढवत आहेत. पवारसाहेब आपले श्रद्धास्थान असल्याचे सांगत अनेकांनी पवारांची साथ सोडली आहे. जिल्ह्यासह अनेक तालुक्‍यात राष्ट्रवादीची धुरा सांभाळण्यासाठी अजूनतरी कोणी मोठा पुढाकार घेतल्याचे दिसत नसून पक्षात असलेल्या मावळण्याची चिंता करत पवारांनी आता पुन्हा दौरे सुरू केले आहेत. जिल्ह्यातील एकही मतदार संघात सक्षम उमेदवार न राहिल्याने आता पावरांची रणनीती काय असणार, हे पाहण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here