दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार सराईताला अटक

पिंपरी  – भोसरी येथील आठवडे बाजारात गोळीबार करून व्यावसायिकाची सोनसाखळी व गल्ल्यातील रोख रक्कम घेऊन फरार झालेल्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बुधवारी (दि. 18) ही कारवाई केली.

गुरुदत्त उर्फ बाबा अशोक पांडे (रा. भोसरी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास कामी त्याला भोसरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, भोसरी येथे आठवडे बाजाराच्या दिवशी अंकुशराव लांडगे सभागृहासमोर अक्षय अंगत भांडवलकर (रा. धावडे वस्ती, भोसरी) हा मोबाईल स्पेअर पार्टस्‌ विक्री करीत होता. त्यावेळी सनी उर्फ सॅन्डी गुप्ता, बाबा पांडे, शिवा खरात, विकास जैसवाल व त्यांचा एक साथीदार असे चारचाकी वाहनातून तेथे आले.

“तुझ्याकडे जे काही असेल ते काढून दे, आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणत अक्षय भांडवलकर याच्यावर सॅन्डी गुप्ता याने गोळीबार केला. त्यानंतर अक्षय भांडवलकर यांच्या गळ्यातील सोनसाखळी व गल्ल्यातील रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन परिसरामध्ये दहशत निर्माण केली होती. भोसरी येथे दि. 11 ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला होता. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी शिवाजी खरात व विकास शाम जैस्वाल यांना अटक करण्यात आली होती मात्र टोळीचा प्रमुख बाबा पांडे फरार होता.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाकडून भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फरारी आरोपींचा शोध घेण्यात येत होता. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार बाबा पांडे हा भोसरी स्मशानभूमी शेजारी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा लावून बाबा पांडे याला शिताफीने अटक करण्यात आली.

बाबा पांडेवर अनेक गंभीर गुन्हे
पकडलेला आरोपी बाबा पांडे भोसरी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याची भोसरी भागात टोळी असून, तो टोळीचा प्रमुख आहे. त्याच्या टोळीचे व भोसरी भागात कार्यरत असलेल्या ज्ञानेश्‍वर लांडगे याच्या टोळीमध्ये वर्चस्वावरून वांरवार खटका उडत होता.

याच कारणावरून सन 2014 मध्ये आरोपी बाबा पाडे यांने त्याचे साथीदार प्रतिक तापकीर, सॅंडी गुप्ता यांच्या मदतीने ज्ञानेश्‍वर लांडगे याच्या टोळीतील अक्षय काटे याचा खून केला होता. तसेच त्याच्यावर हाणामारी, चोरी व आर्म ऍक्‍ट असे एकुण सहा गुन्हे भोसरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. बाबा पांडे याला दोन पिस्तूल व चार काडतुसे बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलीस पथकाने 5 जुलै 2019 रोजी अटक केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.