पुणे विद्यापीठात आता दोन नवीन वसतिगृहे

पुणे – सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वसतिगृहांची प्रवेश क्षमता वाढवण्यात येत आहे. यासाठी दोन नवी वसतिगृहे बांधली जाणार आहेत. त्यात मुलींसाठी 200 आणि मुलांसाठी 400 जागा उपलब्ध होणार आहेत.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी ही माहिती दिली. यावर्षी विद्यापीठाने वसतिगृह प्रवेश प्रक्रियेची नियमावली बदलली. त्यात वसतिगृहाच्या क्षमतेइतक्‍याच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाने “पॅरसाइट’ पद्धत बंद केली. त्याचा परिणाम प्रवेश प्रक्रियेवर होण्याची शक्‍यता होती. त्यानुसार वसतिगृह न मिळाल्याने काही विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्याचे समोर आले. त्यामुळे वसतिगृहांची प्रवेश क्षमता वाढवण्याची मागणी करण्यात आली. येत्या वर्षभरात काम पूर्ण होणार आहे.

मुदतीतच करणार बांधकाम
सध्या विद्यापीठातील नऊ वसतिगृहांमध्ये मिळून सुमारे 3 हजार 500 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. आता नव्या वसतिगृहांमुळे ही क्षमता वाढेल. दोन्ही वसतिगृहांचे बांधकाम ठराविक मुदतीतच पूर्ण केले जाईल. बांधकाम रखडणार नाही, या पद्धतीनेच नियोजन करण्यात आले आहे. मिशन मोड पद्धतीने बांधकाम केले जाणार असल्याचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी स्पष्ट केले.

जम्मू-काश्‍मीरमध्ये शैक्षणिक संशोधन संस्था?
जम्मू-काश्‍मीर येथे 370 कलम रद्द केल्यानंतर पुण्यातील शैक्षणिक संस्थांनी याठिकाणी स्वतंत्र शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने काश्‍मीर येथे विद्यापीठाचे केंद्र सुरू करावे, असा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर विचारविनिमय करून योग्य निर्णय घेण्यात येईल. तसेच याठिकाणी विद्यापीठाचे केंद्राऐवजी शैक्षणिक संशोधन संस्था सुरू करता येईल का? याबाबत विचार सुरू असल्याचे कुलगुरू डॉ. करमळकर यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)