खालापूर, (वार्ताहर) – पाली खोपोली रस्त्यावर पाली फाटा ते देवन्हावे रस्त्यावर महानगर गॅसवाहिनीचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम रस्त्याच्या कडेलाच आणि पिण्याच्या जलवाहिनीच्या बाजूलाच काम सुरू आहे.
भविष्यात पाण्याची वाहिनी किंवा गॅस वाहिनीमध्ये बिघाड झाल्यास किंवा त्या फुटल्यास मोठा धोका होवू शकतो. तसेच रस्त्याच्या बाजूलाच खोदकाम सुरू आहे. बॅरिकेड्स आणि सुरक्षेची व्यवस्था नसल्यामुळे अपघाताची शक्यता आहे.
अँडलॅब इमँजिकाजवळ सीएनजी पंपासाठी महानगर पाइलाइन टाकण्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. रस्त्याचा काही अंतर सोडून खोदकाम करण्याची गरज असताना सर्व नियम तोडून रस्त्याच्या कडेलाच ही पाइपलाइन टाकली जात आहे. खोदकाम केल्यानंतर रस्त्याच्या बाजूला बॅरिकेड्स लावलेले नाहीत. त्यामुळे अनेक अपघात घडले आहेत.
तसेच देवन्हावे ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या जलवाहिनी टाकली आहे. त्याशेजारीच महानगर गँसवाहिनी टाकण्यात आली आहे. भविष्यात जलवाहिनी फुटल्यास जोडणीसाठी वेल्डिंगचा वापर केल्यास महानगर गॅस वाहिनीला धोका पोहचू शकतो. त्यातून मोठा अपघात होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.