किवळे, (वार्ताहर) – माळवाडी गावात श्रीकृष्ण उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. माळवाडी येथे महानुभाव पंथीयांचे श्रीकृष्ण मंदिर आहे. दरवर्षी गावात भगवान श्रीकृष्ण उत्सव समिती माळवाडीच्यावतीने श्रीकृष्ण उत्सव साजरा करण्यात येतो.
या उत्सावानिमित्त पहाटे मूर्तीस मंगलस्नान घालण्यात आले. त्यानंतर गीता पठण झाले. दुपारी महाआरती झाली. गावातील महिला भजनी मंडळाने भजन गीत सादर केले. सात वाजताच्या सुमारास ग्रामस्थांच्यावतीने, गावातून श्रींची पालखीमध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.
पालखी मार्गावर लोटांगण घालत ग्रामस्थांनी आपली श्रद्धा व भक्ती व्यक्त केली. रांगोळी काढत, फुलांची उधळण करीत ’श्रीं’च्या नामाचा जयघोष केला.