पिंपरी (प्रतिनिधी) – पुणे परिमंडलामध्ये १०० टक्के अचूक बिलिंगचे लक्ष्य समोर ठेऊन विविध उपाययोजना सुरू असून पिंपरी चिंचवड शहरातील अचूक बिलिंगचे प्रमाण ९७ टक्क्यांपेक्षा अधिक आहे, असा दावा महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिली. तर, अचूक बिलिंगमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये शाखा कार्यालयानिहाय कृती आराखडा तयार करून स्थानिक उपाययोजना कराव्यात, असेही ते म्हणाले.
रास्तापेठ येथे आयोजित द्वैमासिक आढावा बैठक झाली. त्यात त्यांनी ही माहिती दिली. गेल्या आर्थिक वर्षभरात द्वैमासिक आढावा व उपाययोजनांतील सातत्याने पुणे परिमंडलामध्ये अचूक वीजबिलांच्या प्रमाणात वाढ झाली असून सद्यस्थितीत ९५.४३ टक्के वीजग्राहकांना अचूक बिल देण्यात येत आहे. अचूक बिलिंगचे प्रमाण मार्च २०२४ अखेर ९५.४३ टक्क्यांवर गेले आहे.
तसेच मागील वर्षाच्या तुलनेत सरासरी वीजबिलांमध्ये १.१६ टक्क्यांनी तर मीटर रीडिंगच्या अस्पष्ट फोटोच्या प्रमाणात १.३६ टक्क्यांनी घट झाली आहे. वीजमीटरच्या अचूक रीडिंगसाठी पुणे परिमंडलाकडून दैनंदिन पर्यवेक्षण करण्यात येत आहे.
तसेच उपविभाग कार्यालयांकडून दरमहा मीटर रीडिंगच्या फोटोची १०० टक्के तपासणी करण्यात येत आहे. सोबतच बिलिंगमध्ये सातत्याने सुधारणा करण्यासाठी व विविध उपायोजनांच्या अंमलबजावणीसाठी परिमंडलस्तरावर द्वैमासिक आढावा घेण्यात येत आहे.