पिंपरी (प्रतिनिधी) – टाटा मोटर्सच्या व्हॉलीबॉल मैदानावर औद्योगिक क्रीडा संघटनेतर्फे आयोजित केलेल्या साठाव्या व्हॉलीबॉल पासिंग स्पर्धेत टाटा मोटर्स “अ” संघाने विजेतेपद पटकावले. फॉरविया संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेमध्ये टाटा मोटर्स “अ” व “ब”,फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स “अ” व “ब”,एसकेएफ, फॉरव्हीया, अम्युनेशन फॅक्टरी खडकी, पीसीएमसी, टीटीएल, एसीजी फार्मा, या दहा संघाने भाग घेतला होता.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण टाटा मोटर्सचे एचआर मॅनेजर प्रवीण तांबे, आकाश तीरकसे व टाटा मोटर्स स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष शशिकांत कात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. पारितोषिक वितरण समयी स्पर्धा-वर्षाचा आढावा प्रदीप वाघ यांनी घेतला.
ते म्हणाले की, “व्हॉलीबॉल पासिंग” स्पर्धेने औद्योगिक क्रीडा संघटनेच्या,२०२३-२४ च्या क्रीडावर्ष स्पर्धा-मालिकाची सांगता होत आहे. यावर्षी जवळजवळ बाराशे खेळाडूंनी व शंभरावर कंपन्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला.
या वेळी फॉरविया कंपनी स्पोर्ट्स कमिटीचे दत्ता पाटील, निलेश मठपती, प्रणित गावंडगावे व औद्योगिक क्रीडा संघटनेचे नरेंद्र कदम, विजय हिंगे, हरी देशपांडे उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पंकज बाजड, इर्शाद सय्यद यांनी पंच म्हणून व गुणलेखक म्हणून प्रशांत उबाळे, शिवाजी पाटील, संगप्पा खोत यांनी काम पाहिले. प्रास्ताविक वसंत ठोंबरे व सूत्रसंचालन नरेंद्र कदम यांनी केले. आभार हरी देशपांडे यांनी मानले. या स्पर्धेचे आयोजन विजय हिंगे यांनी केले.