मुंबई : पुण्यातील निवडणुकीत कसब्याच्या जागेवर महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर निवडून आले तर, चिंचवडच्या जागेवर भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप या भरघोस मतांनी जिंकून आल्या. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव झाला आहे. यावरून भाजपा नेते निलेश राणेंनी विरोधी पक्षनेते अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत खालच्या भाषेत टीका केली आहे.
निलेश राणेंनी ट्विट करत “पिंपरी-चिंचवडमध्ये एका महिलने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडलं. **** अजित पवार एक महिना पिंपरी-चिंचवडला ठाण मांडून सुद्धा तुला एका महिलेने पाडलं,” अशा एकेरी शब्दांत निलेश राणेंनी अजित पवारांवर टीकास्र डागलं होतं.
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर देत निलेश राणेंना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “आमच्या पक्षाचा एक संस्कार आहे, जो शरद पवारांनी दिला आहे. एखादं वराह जर घाणीत लोळत असेल, तर त्यावर दगड मारू नये, कारण घाण आपल्या कपड्यावर उडते. पिंपरी-चिंचवडची जागा निवडून आली, तर उन्माद आणि मस्ती कशासाठी करायची. स्वत:चे सिंहासन २०२४ साली वाचवता येत असेल तर पाहा,” असे अमोल मिटकरींनी म्हटले आहे.
“अजित पवारांवर बोलण्याची तुमची वैचारिक आणि शारीरिक उंची नाही. त्यामुळे आपल्या लायकीत बोलावं. आम्हाला पक्षाने काही मर्यादा दिल्या आहेत. नाहीतर जशास तसे उत्तर आम्हालाही देता येतं. मी शेतकऱ्याचा मुलगा असून, फुले-शाहू-आंबेडकर महाराष्ट्राला सांगणारी व्यक्ती आहे. त्यामुळे शरद पवार, अजित पवार आणि पक्षावर बोलणार असाल तर शेपूट गुंडाळून बसणार नाही. ‘तुका म्हणे खळ करु समय निर्मळ,’” असा इशारा अमोल मिटकरींनी दिला आहे.