Sharad Pawar on Narendra Modi । Lok Sabha Election 2024 – बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात उद्या २९ एप्रिल रोजी जाहीर सभा घेणार आहे. या शिवाय, पंतप्रधान मोदी यांचा पुण्यात एक रोड शो आयोजित करण्यात आला आहे.
मोदी यांच्या ‘रोड शो’साठी महायुतीकडून संयुक्त तयारी करण्यात येत असून महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. वातावरण निर्मितीसाठी मोदींच्या ‘रोड शो’ चे आयोजन करण्यात येणार आहे.
बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार, शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील, मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
त्यांच्या प्रचारार्थ २९ एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता रेसकोर्सच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यासह महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
या सभेला भारतीय जनता पार्टीकडून ‘महाविजय संकल्प सभा’ असं नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आल्यानंतर ते शरद पवार यांच्यावर टीका करणार हे निश्चित मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषणात नेमकं काय बोलणार याबाबतचा अंदाज बांधला आहे.
सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सासवडमधील पालखी मैदानावर जाहीर सभा झाली. शरद पवार, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. सासवडमधील पालखी मैदानावर ही सभा झाली.
महाविकास आघाडीतील सर्व पक्षाच्या वतीने सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. भाजपच्या ध्येय धोरणांवर शरद पवार यांनी टीका केली.
पंतप्रधान मोदी सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी जात आहेत. ते महाराष्ट्रात आल्यानंतर ते आमची आठवण काढतात आमच्यावर टीका टिप्पणी करतात उद्या पुण्यामध्ये त्यांची सभा आहे.
तुम्ही त्यांचं भाषण ऐका पुण्यात आल्यानंतर ते भाषणाची सुरुवात पुणेकरांना माझा नमस्कार असं म्हणून करतील. त्यानंतर ते मराठी मध्ये एक- दोन वाक्य म्हणतील आणि त्यानंतर त्यांना शरद पवारांची आठवण येईल अशी खोचक टीका शरद पवारांनी नरेंद्र मोदी यंच्यावर केली.
तसेच शरद पवार पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांच्या ज्यांच्या वरती भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सध्या त्यांच्याच पक्षांमध्ये आहेत. आरोप करायचे आणि नंतर त्या लोकांना आपल्या पक्षात घ्यायचं असं कुठेतरी भाजपने चालवले असल्याचं शरद पवार यांनी सांगितले.