Arvind Kejriwal | campaign song | AAP : ‘जेल के जवाब में हम वोट देंगे’ या आम आदमी पक्षाच्या लोकसभा प्रचार गीतावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे, असा दावा ‘आप’ने केला आहे. या गीतात केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांची बदनामी करण्यात आल्याचे कारण देत ही बंदी घालण्यात आली आहे असे आम आदमी पक्षाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
तथापि यावर निवडणूक आयोगाकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. या संबंधात पत्रकार परिषदेला संबोधित करताना, पक्षाच्या वरीष्ठ नेत्या आतिशी म्हणाल्या की, पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने आमच्या पक्षाच्या प्रचार गाण्यावर बंदी घातली आहे.
या गाण्यात सत्ताधारी पक्ष आणि तपास यंत्रणांना वाईट प्रकाशात दाखवण्यात आले आहे असे त्यांचे म्हणणे आहे, पण गाण्यात भाजपचा उल्लेख नाही आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघनही नाही.
त्यात केवळ तथ्यात्मक व्हिडिओ आणि घटनांचा समावेश आहे,असे त्या म्हणाल्या. त्यांनी आरेाप केला की भाजपचे लोक हुकुमशाही करीत असतील तर ते योग्य आहे, पण त्यावर कोणी भाष्य केले तर ते मात्र अयेाग्य आहे असा सारा उरफाटा मामला आहे.
त्यातून देशात लोकशाही नावाची चीजच अस्तित्वात नाही असे दिसून येते असे त्यांनी नमूद केले. आम आदमी पक्षाचे हे प्रचार गीत पक्षाचे आमदार दिलीप पांडे यांनी लिहिले आणि गायले आहे. गुरुवारी येथील पक्षाच्या मुख्यालयात या गाण्याचे प्रकाशन करण्यात आले.