World Test Championship Points Table 2023-25 : विशाखापटन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने जागतिक कसोटी (World Test Championship) चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे.
विशाखापट्टणम कसोटीपूर्वी टीम इंडिया WTC पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर होती, मात्र आता विजयानंतर रोहित ब्रिगेड दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. म्हणजेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघाला तीन स्थानांचा फायदा झाला आहे.
इंग्लंडला पराभूत केल्यानंतर भारताची विजयाची टक्केवारी 52.77 झाली आहे. टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 सायकलमध्ये आतापर्यंत 6 टेस्ट खेळल्या आहेत, ज्यामध्ये 3 जिंकले आहेत, 2 हरले आहेत आणि 1 ड्रॉ झाला आहे. गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. कांगारू संघाने आतापर्यंत 10 कसोटी खेळल्या आहेत, ज्यात त्यांनी 6 जिंकले आहेत, 3 गमावले आहेत आणि 1 अनिर्णित राहिला आहे. ऑस्ट्रेलिया 55.00 टक्के विजयासह पहिल्या क्रमांकावर आहे.
IND vs ENG 2nd Test : भारताकडून इंग्लंडचा 106 धावांनी पराभव, बुमराह-जैस्वाल ठरले हिरो….
गुणतालिकेतील टाॅप-5 संघ…
पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया तर दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे, ज्याने 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. पुढे जात न्यूझीलंड चौथ्या आणि बांगलादेश पाचव्या स्थानावर आहे. न्यूझीलंड आणि बांगलादेशनेही 2 पैकी प्रत्येकी 1-1 सामने जिंकले आहेत. इंग्लंडबद्दल बोलायचे झाले तर दुसऱ्या कसोटीत भारताविरूध्दच्या पराभवनंतर हा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर कायम आहे. इंग्लंडच्या खाली श्रीलंका हा एकमेव संघ आहे, ज्याने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही.