बीजिंग – करोनाची साथ सर्वात जास्त पसरलेली असताना चीनमधील सर्वात पहिली कोविड लस विकसित करणाऱ्या संशोधकाला चीनच्या संसदेतून हाकलून देण्यात आले आहे. यांग शियाओमिंग असे या शास्त्रज्ञाचे नाव असून भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
चायना नॅशनल फार्मासोटिक ग्रुपच्या लस विषयक शाखा असलेल्या चायना नॅशनल बायोटेक ग्रुपचे शियाओमिंग हे अध्यक्ष आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांचे नॅशनल पीपल्स कॉंग्रेसचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टीच्या शिस्तपालन रिवाजानुसार त्यांच्यावर शिस्त आणि कायद्याचे गंभीर उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यांग यांच्यावरील आरोपांची अजूनही पक्षाच्या शिस्तपालन समितीकडून चौकशी केली जाते आहे.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्या काही वर्षांपासून आरोग्य क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात मोठी धडक मोहीम सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून यांग यांच्यावर ही कारवाई केली गेली आहे.
यांग हे वरिष्ठ संशोधक असून त्यांच्या नेतृत्वाखालील चमूने चीनमधील सर्वात पहिली कोविड प्रतिबंधक लस तयार केली होती. त्यांनी विकसित केलेली सिनोफार्म आणि कोरोनावॅक ही लस चीनमध्ये सर्वाधिक प्रमाणात नागरिकांना दिली गेली होती.
ही लस परदेशात देखील निर्यात केली गेली होती. करोनाचा संसर्ग सर्वात पहिल्यांदा मार्च २०२० मध्ये चीनमधील वुहान शहरात आढळून आला होता. नंतर ही साथ जगभर पसरली आणि लक्षावधी लोक या साथीमध्ये मरण पावले होते.