India – Pakistan News: भारत-पाकिस्तानमधील संबंध कितीही रसातळाला पोहोचले असले तरी दोन्ही देशांतील लोकांमध्ये आजही ह्रदयाचे नाते जोडलेले आहे. कराची येथील 19 वर्षीय तरुणीला ह्रदयाचा आजार जडला होता. पाकिस्तानातील रुग्णालयात गेले तेव्हा त्यांना हृदय प्रत्यारोपण करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र प्रत्यारोपणासाठी लागणारा मोठा खर्च आणि उपचाराच्या अपुऱ्या सुविधांमुळे मुलीवर उपचार होऊ शकले नाहीत. ( heart transplant operation)
यानंतर त्यांनी भारतात उपचार करण्यासाठी प्रयत्न सुरु केल. त्यानंतर त्या मुलीच्या उपचारासाठी केवळ वैद्यकीय व्हिसाच दिला गेला नाही तर मोफत हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून नवजीवन देण्यात आले आहे. सध्या तिच्यावर चेन्नईमध्ये उपचार सुरू असून लवकरच ती पाकिस्तानात परतणार आहे.
कराची येथील रहिवासी आयशाला हृदयविकाराचा आजार –
कराची येथील रहिवासी असलेल्या आयशा राशन ला (सिव्हियर हार्ट डिसफंक्शन) हृदयाच्या गंभीर विकाराने ग्रासले होते. या आजारात हृदय योग्यरित्या कार्य करू शकत नाही. हृदयाच्या झडपात गळती झाली होती, त्यावर प्रत्यारोपण हा एकमेव उपचार होता. यासाठी तीला एका दात्याची गरज होती जो आता या जगात नाही पण त्याचे हृदय योग्यरित्या कार्यरत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात हृदय प्रत्यारोपणासाठी चांगल्या सुविधांची माहिती मिळाल्यानंतर, आयशा तिच्या आईसोबत चेन्नईला पोहोचली, जिथे तिला एमजीएम हेल्थकेअरमध्ये दाखल करण्यात आले. हृदयविकारामुळे त्यांना ईसीएमओमध्ये ठेवण्यात आले होते. या वॉर्डमध्ये आधुनिक सुविधांसह लाइफ सपोर्ट सिस्टीम आहे, ज्याद्वारे जीवघेणा आजार किंवा गंभीर जखमी लोकांवर उपचार करण्याची व्यवस्था केली जाते.
हृदय विमानाने चेन्नईला नेण्यात आले –
रिपोर्टनुसार, आयशा हार्ट ट्रान्सप्लांटच्या बाबतीत खूप लकी होती. दिल्लीत त्यांना एका मृत दात्याचे हृदय मिळाले. ते हृदय फार कमी वेळात विमानाने चेन्नईला नेण्यात आले. यानंतर आयशाच्या हृदय प्रत्यारोपणाचे ऑपरेशन तातडीने करण्यात आले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृदय प्रत्यारोपणाच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी देशात किमान 35 लाख रुपये खर्च येतो. या अवाढव्य खर्चामुळे अनेक वेळा दाता हृदय मिळूनही लोकांना उपचार घेता येत नाहीत आणि ते हृदय निरुपयोगी ठरते. मात्र, आयशा रशनला तिचे हृदय वेळेवर मिळाले, विशेष म्हणजे तिच्या ऑपरेशनचा संपूर्ण खर्चही उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आणि ट्रस्टने दिला.
आईने भारतातील लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली –
आयशाच्या आईने आपल्या मुलीचे प्राण वाचवल्याबद्दल रुग्णालय व्यवस्थापन, डॉक्टर, हृदयदात्याचे कुटुंब आणि मेडिकल ट्रस्टचे आभार मानले आहेत. या सर्वांनी मदत केली नसती तर कदाचित त्यांची मुलगी वाचली नसती, असे त्या म्हणाल्या. भारतातील लोकांची ही मदत मी कधीच विसरणार नाही, असे आयशाच्या आईने सांगितले.