वॉशिंग्टन – खलिस्तानी फुटिरतावादी नेता गुरपतवंत सिंग पन्नून याची अमेरिकेत हत्या करण्यासाठी रचलेल्या कटामध्ये भारतीय गुप्तचर संघटना रिसर्च ऍनालिसिस विंग अर्थात रॉ चे अधिकारी विक्रम यादव सहभागी होते.
तसेच या हत्येच्या कटाला भारतीय गुप्तचर संघटनेचे तत्कालिन प्रमुख सामंत गोयल यांची मंजूरी घेण्यात आली होती, असा दावा वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकेतील दैनिकाने केला आहे.
पन्नून हा खलिस्तानी चळवळीतला आघाडीचा म्होरक्या आहे. शीखांसाठी स्वतंत्र देशाची मागणी करणाऱ्या शीख फॉर जस्टिस या खलिस्तानी फुटिरतावादी संघटनेचा तो कायदेशीर सल्लागार आणि प्रवक्ता देखील आहे. भारत सरकारने पन्नूनला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
भारताच्यावतीने उत्तर अमेरिकेत सक्रीय असलेल्या भारतविरोधी गटांच्या म्होरक्यांना संपवण्यासाठी एक धडक मोहिम यापुढेही राबवली जाईल. या मोहिमेमुळे पाश्चात्य सुरक्षा अधिकारी अचंबित होऊ शकतात, असा अंदाज देखील वॉशिंग्टन पोस्टने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे.
पन्नूच्या हत्येच्या कटासंदर्भात यापूर्वी कधीच यादव या अधिकाऱ्याचे नाव घेण्यात आले नव्हते. त्यांची ओळख आणि भारतीय गुप्तचर संघटनेतील त्यांचे पद देखील उघड झाले नव्हते. मात्र आता ही ओळख उघड केली गेली आहे. यामुळे पन्नूनच्या हत्येच्या कटाचे निर्देश भारतीय गुप्तचरांनीच दिले असल्याचे पुरावे मिळाले असल्याचेही या वृत्तामध्ये म्हटले आहे.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी हा कट उघड केला होता. या कटामध्ये रिसर्च ऍनालिसिस विंग अर्थात रॉ चे उच्चस्तरिय अधिकारीही सहभागी होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींशी अगदी निकटचे संबंध असलेल्या वर्तुळातील राजकीय धागेदोरेही या प्रकरणात गुंतलेले असल्याचे सीआयए, एफबीआय आणि पाश्चात्य तपास संस्थांच्या विद्यमान आणि माजी अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात आढळून आले असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्राची मालकी सध्या अब्जाधीश आणि ऍमेजोनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्याकडे आहे. सीमापार प्रतिनिधी पाठवून अशा मोहिमा राबवल्या जाण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच भारत आणि इतर देशांचे नेतृत्व करणाऱ्या जागतिक शक्ती सामान्यतः जगातील सर्वात दडपशाही करणाऱ्या देशांशी असे डावपेच खेळत असल्याबद्दल वॉशिंग्टन पोस्ट पाठपुरावा करत असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.
या शोध पत्रकारितेसाठी नवी दिल्ली, वॉशिंग्टन, ओटावा, लंडन, प्राग आणि बर्लिन येथे अधिकारी, तज्ज्ञ आणि लक्ष्य करण्यात आलेल्या शेकडोंच्या मुलाखती घेण्यात आल्याचा हवालाही देण्यात आला आहे.
काय होता कट
खलिस्तानी हरदीप सिंग निज्जरची कॅनडामध्ये सरे भागात गेल्या वर्षी १८ जूनला गोळ्या घालून हत्या केली गेली होती. तशाच प्रकारे अमेरिकेत पन्नूनला संपवण्याचा कट केला गेला होता. पाकिस्तानमध्ये ११ शीख आणि काश्मिरींची हत्या झाली होती. त्यानंतर परदेशातील दहशतवाद्यांना संपवण्यासाठी हे दोन्ही कट केले गेले होते, असे या वृत्तात म्हटले आहे.
मात्र या वृत्तावर भारतीय अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. अमेरिकेने केलेल्या कटाच्या आरोपानंतर या आरोपाचा तपास करण्यासाठी एक उच्चस्तरिय समिती कार्यरत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैयस्वाल यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते.