कराड -राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या धर्तीवर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने कार्य करावे, असे आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची सन 2020-2021 या वर्षामधील संचालक मंडळाची पहिली सभा पुणे येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
ना. पाटील म्हणाले, शेतकरी उत्पादक संस्थांच्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी महामंडळाने नोडल एजन्सी म्हणून काम करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा. जेणेकरुन राज्यस्तरावर शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण होईल.
या सभेमध्ये डॉ. सुधीरकुमार गोयल, साखर आयुक्त शेखर गायकवाड, सहकार आयुक्त अनिल कवडे, सनदी लेखापाल गोकुळ राठी, पणन संचालक सतिशकुमार सोनी, सचिव संतोष पाटील उपस्थित होते. व्यवस्थापकीय संचालक मिलींद आकरे यांनी विषयांचे सादरीकरण केले.
शेतकरी उत्पादक कंपनीचा वित्तपुरवठा, व्यवसाय प्रस्ताव, लेखापरीक्षण, प्रशिक्षण, बाजार जोडणी, कृषि निविष्ठा पुरवठा आदी कामे एकाच छत्राखाली करता येईल, असे मत डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत कृषि व्यवसाय वृध्दी कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षामार्फत सद्यस्थितीत सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून त्यास प्रचंड प्रतिसाद लाभत असल्याने या कक्षाचे बळकटीकरण करण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली.
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने देशस्तरावरील इफको, कृभको यांचे राष्ट्रीयकृत पुरवठादार म्हणून नोंदणी केली असून त्यामार्फत शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते माफक दरात उपलब्ध करुन देण्याकरीता प्रयत्नपूर्वक कामकाज सुरु केल्याचे सांगण्यात आले.