Beed Lok Sabha Election – बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यात लढत होत आहे. बीड लोकसभा निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडेंसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात आहे. बीड लोकसभा मतदारसंघात येत्या 13 मे रोजी मतदान होणार आहे.
या लोकसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळत आहे. बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी पारंपारिक लढत यावेळी असून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे यंदा ही लढाई टोकाला पोहोचल्याचं दिसून येत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीचा बीड हा केंद्रबिंदू असल्याने यंदा येथील निवडणुकीला जातीय रंग लागल्याचे दिसत आहे. पंकजा मुंडे (वंजारी) ओबीसी तर बजरंग सोनवणे मराठा उमेदवार आहेत.
या निवडणुकीला जातीय रंग आल्याने येथे प्रचारात विकासाच्या मुद्द्यांपेक्षा जातीचा मुद्दाच पुढे येताना पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात यापूर्वी जेवढे खासदार निवडून आले त्यांची जात कधीच काढली गेली नाही, असं सांगत धनंजय मुंडेंनी आजपर्यंतच्या खासदारांची यादीच वाचून दाखवली. तसेच, आता आमची जात का काढली जातेय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. धनंजय मुंडे यांनी निवडणुकीत जात आल्याचे म्हटल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी देखील त्यांना प्रत्त्युत्तर दिलं आहे. या निवडणुकीमध्ये आमच्यासाठी कोणतीही जात हा मुद्दा नाही, आम्ही सेक्युलर विचाराचे आहोत. याउलट धनंजय मुंडेच निवडणुकीत जात फॅक्टर चालवत असल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे.
बीडमधील जातनिहाय आकडेवारी (अंदाजे)
मराठा – 7 ते साडेसात लाख, वंजारी – 4.50 ते 5 लाख, दलित – 2 ते 2.25 लाख, मुस्लिम – 2.25 ते 2.50 लाख, ओबीसी – म्हणजेच माळी आणि धनगर 2 ते 2.50 लाख, असे बीड जिल्ह्यात 21 लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत.
दरम्यान, राज्यात झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनानंतर यंदाच्या निवडणुकांत मराठा आणि ओबीसी उमेदवार एकमेकांसमोर उभे असल्याने दोन्ही समाजामध्ये आता जातीय तेढ निर्माण होताना पाहायला मिळत आहे. यापूर्वी देखील लोकसभा निवडणुकीत जातीचा मुद्दा असायचा. मात्र, यावेळेस या मुद्द्याला जास्त हवा मिळत असून याचे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरही होतील, असं राजकीय विश्लेषक सांगतात.
निवडणुक प्राचारादरम्यान, पंकजा मुंडे यांना दोन ठिकाणी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा बांधवांच्या आक्रोशाचा सामना करावा लागला. त्यामुळे, पंकजा मुंडे यांनी हे मराठा आंदोलक नसून मुद्दाम जातीय तेढ निर्माण करण्यासाठी सुरू असलेला प्रायोजित कार्यक्रम असल्याचे म्हटलं. बीड जिल्ह्यात यापूर्वी असं वातावरण निवडणुकीत कधीच पाहायला मिळालं नाही. बीड जिल्ह्यात सध्या जे चित्र निर्माण झालंय, त्यामुळे बीड जिल्ह्याच्या भवितव्याची चिंता वाटत असल्याची खंत पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली आहे.
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्या भगिणी प्रीतम मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात लढत झाली होती. यावेळी प्रीतम मुंडे यांनी दीड लाखांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.
बीड लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे.