Beed Lok Sabha Election | Pankaja Munde | Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत भाजपा विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी त्यांची थोरली बहीण तथा भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. ही चर्चा खरी ठरली असून भाजपाने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली.
यात बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांचे नाव जाहीर केले आहे. त्यांच्या विरोधात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बजरंग सोनवणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाचं स्वागत करुन पंकजा मुंडे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. आता पंकजा मुंडेंसाठी बीडमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. त्यामुळे, मोदींच्या सभेपू्र्वीच बीड जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
पंकजा मुंडेंसाठी बीडमध्ये अद्याप कुठल्याही भाजपाच्या बड्या नेत्याने सभा घेतल्याचे दिसून येत नाही. मात्र, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आता बीडमध्ये प्रचारासाठी येत आहे. मोदींच्या बीडमधील प्रचारसभेचा मुहूर्त ठरला असून 10 मे रोजी नरेंद्र मोदींची येथे सभा होणार आहे.
नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात झंझावाती प्रचार सुरू केला असून पंकजा यांच्यासह हिना गावित व सुजय विखे पाटील यांच्यासाठीही नरेंद्र मोदींची जाहीर सभा होत आहे. त्यानुसार, नंदुरबार व अहमदनगरमध्ये 7 मे रोजी पंतप्रधानांच्या जाहीर सभा होत असून 10 मे रोजी बीड लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा होत आहे.
या लोकसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळत आहे. बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी पारंपारिक लढत यावेळी असून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे यंदा ही लढाई टोकाला पोहोचल्याचं दिसून येत आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीचा बीड हा केंद्रबिंदू असल्याने यंदा येथील निवडणुकीला जातीय रंग लागल्याचे दिसत आहे. पंकजा मुंडे (वंजारी) ओबीसी तर बजरंग सोनवणे मराठा उमेदवार आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवार, दि. 13 मे रोजी मतदान होणार आहे.
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्या भगिणी प्रीतम मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात लढत झाली होती. यावेळी प्रीतम मुंडे यांनी दीड लाखांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.