Share Market 2 May 2024: भारतीय शेअर बाजार गुरुवारी, 2 मे रोजी वाढीसह बंद झाले. आज सेन्सेक्स 128 अंकांनी वाढला. तर निफ्टी 22,650 च्या जवळ पोहोचला. छोट्या आणि मध्यम समभागातही चांगली खरेदी झाली. व्यवहारादरम्यान बीएसई मिडकॅप निर्देशांकाने 42,564.25 अंकांच्या नवीन उच्चांकाला स्पर्श केला. तर स्मॉलकॅप निर्देशांक 0.29 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी आज 2.07 लाख कोटी रुपयांची कमाई केली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऑटो, मेटल, ऑइल अँड गॅस आणि पॉवर निर्देशांक सर्व 1 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह बंद झाले. दुसरीकडे, बँकिंग आणि रियल्टी समभागांमध्ये घसरण दिसून आली.
व्यवहाराच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स 128.33 अंकांनी किंवा 0.17% ने वाढून 74,611.11 वर बंद झाला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 43.35 अंकांनी किंवा 0.19% ने वाढून 22,648.20 वर बंद झाला.
गुंतवणूकदारांनी कमावले ₹ 2.07 लाख कोटी –
BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 2 मे रोजी वाढून 408.62 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे मंगळवार, 30 एप्रिल रोजी 406.55 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज 2.07 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.07 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक वाढणारे समभाग –
बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 18 समभाग आज वाढीसह बंद झाले. यामध्येही पॉवर ग्रिडच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.91 टक्के वाढ झाली. यानंतर एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, एनटीपीसी आणि टाटा स्टीलचे शेअर्स सर्वाधिक वाढले आणि 1.45% ते 3.36% वाढीसह बंद झाले.
सेन्सेक्सचे सर्वाधिक घसरलेले 5 समभाग –
सेन्सेक्सचे केवळ 12 समभाग आज घसरणीसह बंद झाले. त्यातही कोटक महिंद्रा बँकेचे समभाग 2.95 टक्क्यांनी घसरले. याशिवाय भारती एअरटेल, ॲक्सिस बँक, विप्रो आणि आयसीआयसीआय बँकेचे समभाग 1.05% ते 1.41% पर्यंत घसरून लाल रंगात बंद झाले.
1,924 समभाग घसरले –
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर आज, एकूण 3,957 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 1,913 शेअर्स वाढीसह बंद झाले. 1,924 समभागांमध्ये घसरण दिसून आली. तर 120 समभाग कोणत्याही चढउताराविना समपातळीत बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 268 समभागांनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 12 समभागांनी त्यांच्या 52 आठवड्यांच्या नीचांक गाठला.