पिंपरी (प्रतिनिधी) – सामाजिक सुरक्षा देण्यासाठी कामगारांना लागू केलेल्या राज्य विमा कर्मचारी योजनेची कामगारांना अडचणच अधिक होत असल्याची ओरड आहे. आपत्कालीन परिस्थितीत खासगी रुग्णालयांमध्ये घेतलेल्या वैद्यकीय उपचारांची बिले सादर करण्यासाठी भरमसाठ कागदपत्रे गोळा केल्यानंतरही बिल मिळण्यासाठी ईएसआयच्या मोहननगर रुग्णालयाकडे सादर केलेले प्रस्ताव नामंजूर होण्याची संख्या अधिक आहे. त्यामुळे ही योजना असूनही कामगारांची मोठी फरफट होत आहे.
कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय सुविधा देण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या राज्य विमा कर्मचारी योजनेतील जाचक अटी कामगारांची डोकेदुखी ठरत आहेत. खासगी रुग्णालयात घेतलेल्या उपचारांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रकरण सादर करण्यासाठी एकूण जवळपास 20 कागदपत्रांच्या यादीकडे बोट दाखविले जाते. आधीच आजाराने पिचून गेलेला कामगार ही कागदपत्रे जमा करताना गलितगात्र होतो. त्यातच हे प्रकरण वर्षभरात सादर करावयाचे असल्याने कामाचे खाडे करत सादर करायला गेलेल्या प्रकरणात असलेल्या त्रुटी एकादाच सांगितल्या जात नाहीत. प्रत्येकवेळी नव्या कागदपत्रांची मागणी ठरलेली असल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी अनेकदा वादविवादाचे प्रसंग घडले आहेत. वैद्यकीय बीले सादर करण्यासाठी आलेल्या कामगारांच्या अंगावर खेकसणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीवर याठिकाणच्या वरिष्ठांचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे सिद्ध झाले आहे.
रुग्णांच्या रॅम्पवर कर्मचाऱ्यांची वाहने
मोहननगर रुग्णालय कोविड समर्पित असल्याने बिगरकोविड रुग्णांना उपचारासाठी चिंचवड स्टेशनच्या कॉर्पोरेट कार्यालयातील दवाखान्यात पाठविले जाते. मात्र, याठिकाणी रुग्णांच्या ये-जाकरिता असलेल्या रॅम्पवरच कर्मचाऱ्यांची वाहने लावली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत व्हीलचेअर अथवा स्ट्रेचरवरुन आणलेल्या रुग्णांना या दवाखान्यात कसे न्यायचे असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.
धक्कादायक सल्ले
सध्या मोहननगर येथील इएसआय रुग्णालय कोविड समर्पित आहे. मात्र, हे रुग्णालय कोविड समर्पित होण्यापूर्वी गरोदरपणाच्या उपचाराकरिता आलेल्या एका महिला कामगार विमाधारकाला कोविड समर्पित ससून अथवा वायसीएममध्ये दाखल होण्याचा सल्ला येथील स्त्रीरोग तज्ज्ञांनी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याशिवाय राज्य व केंद्र सरकार ओरडून सांगत आहे की, गर्भवती कामगारांनी कोविड-19 च्या काळात बाहेर पडू नये, मात्र. बाळंतपणाच्या तारखेपूर्वी दीड महिने अगोदर तुम्हाला बाळंतपणाची पगारी रजा घेता येणार नसल्याचे ठणकावून सांगणारा प्रतापदेखील या रुग्णालयात घडला आहे.