पाथर्डी : शेवगाव येथे उद्या रविवारी (दि. २८) होणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेच्या जाहिरातीत स्व. गोपीनाथ मुंडे व स्व. राजीव राजळे यांचे फोटो छापल्याने या फोटोला भाजपचे कार्यकर्ते व पंचायत समितीचे माजी सभापती विष्णुपंत अकोलकर यांनी हरकत घेतली. या विषयावर त्यांनी सहायक निवडणूक अधिकाऱ्यांकडे ही जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्याच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
शेवगाव येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची रविवारी सभा होणार असून या सभेच्या जाहिरातीमध्ये मुंडे व राजळे यांचे फोटो छापण्यात आले आहे. यासंदर्भात अकोलकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, उद्या नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शेवगाव येथे शरद पवार यांची सभा होत आहे. या सभेच्या जाहिरातीमध्ये स्व. मुंडे व स्व. राजळे यांचे फोटो छापण्यात आले आहे. सभेचे निमंत्रक म्हणून केवळ महविकास आघाडी पाथर्डी-शेवगाव असे छापण्यात आले आहे. मुंडे व राजळे यांचे फोटो छापल्यामुळे लोकांची दिशाभूल होत आहे. राजळे यांच्या पत्नी मोनिका राजळे या भाजपच्या आमदार आहेत.
त्या लोकसभेचे भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांचा प्रचार करत आहेत. मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या भाजपकडून बीड मतदारसंघात उमेदवार म्हणून उभ्या आहेत. मुंडे व राजळे यांचे फोटो छापताना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची लेखी परवानगी संबंधितांनी घेणे गरजेचे होते. दिवंगतांचे फोटो छापताना तरी कुटुंबातील सदस्य किंवा त्यांच्या वारसांची परवानगी घेणे गरजेचे आहे. ही जनतेची फसवणूक असून या जाहिरातीमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने तात्काळ या नेत्यांचे फोटो जाहिरातीमधून काढून टाकावेत तसेच आचारसंहिता नियमानुसार निमंत्रक, निवडणूक प्रतिनिधी व उमेदवार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अकोलकर यांनी तक्रारीत केली आहे.