पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहराने आज करोना रुग्णसंख्येचा दहा हजारांचा टप्पा पार केला. आज नवीन 689 रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या 10,446 इतकी झाली आहे. तसेच गेल्या 24 तासात करोनाने आणखी 15 रुग्णांचा बळी घेतला आहे. यामुळे शहरातील करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या आता 226 इतकी झाली आहे.
शनिवारी दिवसभरात 689 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 656 तर शहराबाहेरील 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या 10,446 इतकी झाली आहे. तर सद्यस्थितीत शहरात 3649 इतके रुग्ण उपचाराधीन आहेत. शहरात आज 15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील एकूण मृतांची संख्या 226 इतकी झाली आहे. आज शहरातील आकुर्डी, पिंपरी, काळेवाडी, चिंचवड, संत तुकारामनगर, भोसरी, निगडी येथील 13 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील खेड व खडकी येथील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज दिवसभरात 580 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 6480 इतकी झाली आहे.
“लॉकडाऊन’मध्ये सर्वाधिक वाढ
करोनाच्या पार्श्वभूमीवर पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. परंतु या पाच दिवसांच्या काळात शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले. या पाच दिवसांमध्ये रोज चारशेहून अधिक रुग्ण आढळले आहेत. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी 557, दुसऱ्या दिवशी 449, तिसऱ्या दिवशी 547, चौथ्या दिवशी 715 आणि पाचव्या दिवशी 689 रुग्णांची भर पडली आहे. पाच दिवसांत 2957 रुग्णांची भर पडली आहे.