Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीच्या 5 व्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी गुरुवारी विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून (Kalyan Lok Sabha Constituency) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे यांचा सामना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांच्याशी होणार आहे.
महाविकास आघाडीचे उत्तर पश्चिम मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेच्या रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्याशी सामना होणार आहे. पालघर मतदार संघातील ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान, लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, कल्याण , पालघर, भिवंडी, ठाणे आणि मुंबईतील सहा मतदारसंघाचा समावेश आहे. 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत.