Gloucestershire Ben Wells Retirement : क्रिकेटमधून खेळाडू अनेकदा वयाच्या 35 व्या वर्षी निवृत्त होतात. पण तुम्हाला आम्ही सांगतो की, इंग्लंडच्या एका खेळाडूने वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. खरं तर, ग्लुस्टरशायरकडून खेळणाऱ्या इंग्लंडच्या बेन वेल्सला वयाच्या 23व्या वर्षी क्रिकेटला अलविदा म्हणावं लागलं. हृदय संबंधी गंभीर आजार झाल्याचे निदान झाल्यानंतर वेल्स याला हा कठीण निर्णय घ्यावा लागला.
चाचणी दरम्यान, वेल्सला एरिथमोजेनिक राईट व्हेंट्रिक्युलर कार्डिओमायोपॅथी (एआरव्हीसी) असल्याचे निदान झाले, ज्यामुळे तो जड वर्कआउट करू शकला नव्हता. या आजाराची माहिती मिळताच वेल्सने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला.
वेल्सच्या निर्णयाबाबत, ग्लूस्टरशायर (Gloucestershire) काउंटी क्लबने सोशल मीडियावर त्याच्यासाठी एक पोस्ट केली आहे, त्यात लिहिले आहे की, “बेन वेल्सच्या व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्तीच्या घोषणेने ग्लूस्टरशायरला खूप दुःख झाले आहे.”
पुढे लिहिले आहे की, “नियमित तपासणीनंतर, बेनला हृदय संबंधी गंभीर आजार झाल्याचे निदान झाले आणि तो खेळणे सुरू ठेवण्यास असमर्थ आहे. ग्लोसमधील प्रत्येकजण बेनसाठी दु:खी आहे आणि आम्ही सगळे पूर्णपणे त्याच्या पाठिशी आहोत.”
Gloucestershire is devastated to announce Ben Wells is to retire from professional cricket.
Following a routine screening, Ben was diagnosed with a heart condition and is unable to continue playing cricket
Everyone at Glos is heartbroken for Ben & offers him our full support 💛
— Gloucestershire Cricket (@Gloscricket) May 1, 2024
एका निवेदनात बेन वेल्सने म्हटले आहे की, “दुर्दैवाने, याचा अर्थ मी व्यावसायिक क्रिकेटमधून तत्काळ निवृत्ती घेतली पाहिजे आणि येत्या काही आठवड्यांत मला डिफाइब्रिलेटर प्रत्यारोपित करणे आवश्यक आहे.”
त्याने पुढे म्हटले आहे की, “हा चढ-उतारांचा प्रवास आहे. वयाच्या 18 व्या वर्षी करार न मिळण्यापासून ते वयाच्या 21 व्या वर्षी ग्लूस्टरशायरमध्ये संधी मिळणे, अनेक मोठ्या दुखापतींना सामोरे जाणे आणि कारकिर्दीचा शेवट माझ्या पहिल्या आणि एकमेव व्यावसायिक शतकासह करणे, जी आता माझी शेवटची खेळी आहे.”