गृह सोसायट्यांना पुरवठा करण्यास शेतकरी कंपन्या तयार
पुणे – शहरी भागातील हाऊसिंग सोसायटी भागातील ग्राहकांना फळे, भाजीपाला, धान्य व अन्य शेतमाल स्वस्त दरात पोहचविण्यास शेतकरी उत्पादक कंपन्या तयार आहेत. यासाठी पुणे व मुंबई येथील हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष, सचिव यांनी आपल्या सोसायटीत किती व कोणता शेतमाल लागणार आहे, याची माहिती व्हॉट्सऍप ग्रुपवर घ्यावी. संबंधित शेतकरी उत्पादक कंपनीस दराबाबत चर्चा करून ताजा माल सोसायटीधारकांनी मागवून घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे राज्य व्यवस्थापक विजय गोफणे यांनी केले आहे.
भाजीपाला काही ठिकाणी विक्रेते चढ्या दराने विकत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यातून नागरिकांना त्यांच्या सोसायटीमध्येच परवडणाऱ्या किमतीत ताजा भाजीपाला उपलब्ध करून देण्याचा पर्याय समोर आला आहे. या अंतर्गत कृषी विभाग व आत्मा यांच्याशी चर्चा केल्यानंतर शेतकरी गट व शेतकरी कंपन्या यांच्याशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे काही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शहरातील नागरिकांना दररोज ताजा भाजीपाला पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत पुणे व मुंबईत शेतकरी कंपन्यांनी भाजीलपाला विक्रीस सुरुवात केली आहे.
पुणे शहरातील गृहनिर्माण सोसायटीच्या ग्राहकांना फळे, भाजीपाला, धान्य, दूध, शेतमाल इत्यादी घरपोच पुरवठा करण्यास इच्छुक शेतकरी उत्पादक कंपनी व सहकारी संस्था यांची माहिती गोळा केली जात आहे.
सरकारी नियमांत चालणार काम…
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे मार्फत पुणे शहरातील गृहनिर्माण संस्थासोबत जोडणी करून दिली जाईल, अर्थात थेट विक्रीसाठी आवश्यक वाहन परवाने व शासकीय परवानगी तसेच करोनाच्या अनुषंगाने सरकारने दिलेले आदेश व सूचना यांचे काटेकोरपणे पालन करून हा पुरवठा करायचा आहे. त्यासाठी शेतकरी, शेतकरी कंपनी, गट व खरेदीदार, ग्राहक सहकारी सोसायटीचे अध्यक्ष यांनी सचिवांनी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे राज्य व्यवस्थापक विजय गोफणे 9404080001 यांच्याशी संपर्क साधावा.