नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारविरोधात आणण्यात येणाऱ्या अविश्वास प्रस्तावावर मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन व्हिप काढण्यात आले आहेत. एकीकडे अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांनी व्हिप काढला आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाचे मोहम्मद फझल यांनी देखील व्हिप काढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार लोकसभेत मोदी सरकारच्या बाजूने मतदान करणार की विरोधात याची उत्सुकता लागली आहे.
संसदेच्या अधिवेशनात अविश्वास प्रस्तावावर मागील दोन दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या प्रस्तावाच्या मतदानासाठी दोन व्हीप काढले आहेत. त्यामुळे मोठा राजकीय गोंधळ निर्माण होणार असल्याचे दिसत आहे. अविश्वास प्रस्तावावर जेव्हा लोकसभेत चर्चा होते. तेव्हा मतदान देखील होत असते. या मतदानात राष्ट्रवादीची भूमिका गेम चेंजरची ठरणार आहे. लोकसभेत राष्ट्रवादीचे पाच खासदार आहेत. यापैकी ४ महाराष्ट्रातील आहेत. तर एक खासदार लक्षद्वीपचे आहेत.
सुप्रिया सुळे, मोहम्मद फैझल, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील हे शरद पवार गटाचे आहेत तर सुनिल तटकरे हे अजित पवार गटाचे आहेत. त्यामुळे कुठल्या व्हीपला लोकसभा अध्यक्ष अधिकृत मान्यता देतात. यावर पुढच्या कारवाईचे भवितव्य अवलंबून आहे. व्हीपचे उल्लंघन पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा ठरतो. दोनी गटांनी एकमेकांच्या विरोधात व्हीप काढल्यामुळे लढाई तीव्र होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या प्रकरणावर व्हीपचा मुद्दा कळीचा ठरला होता. त्यामुळे राष्ट्रवादीतील आगामी कायदेशीर लढाईचे हे संकेत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार गटाला अद्याप वेगळा पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे तटकरे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.