मुंबई – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप लगावले आहे. स्मृती इराणी म्हणाल्या की, भाषण संपवून लोकसभेतून बाहेर पडताना राहुल गांधींनी महिला खासदारांकडे फ्लाइंग किसचे हावभाव केले. भाजपच्या अनेक महिला खासदारांनी राहुल गांधींविरोधात लोकसभा अध्यक्षांकडे लेखी तक्रार केली आहे.
राहुल गांधी यांच्या कथित असभ्यतेबद्दलही स्मृती इराणी यांनी सभागृहात तक्रार करताना म्हटले की, “माझा एका गोष्टीवर आक्षेप आहे. ज्याला (राहुल गांधी) माझ्यासमोर बोलण्याची संधी दिली गेली, त्यांनी जाण्यापूर्वी असभ्य वर्तन केले. हा प्रकार देशाच्या सभागृहात कधीही द्वेषपूर्ण वागणूक दिसली नाही. देश कोणत्या घराण्याची लक्षणे पाहत आहे.’ या प्रकरणावर आता विरोधी पक्षातील नेत्यांकडून भाजप नेत्यांच्या टीकेवर सडेतोड उत्तर दिले जात आहे.
अशात यावर आता उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संजय राऊत म्हणाले,’भाजपा कधी कोणत्या गोष्टीचं प्रदर्शन करेल, राजकारण करेल हे सांगता येत नाही. जंतरमंतरला महिला कुस्तीपटू आंदोलनाला बसल्या होत्या तेव्हा कुणी तिथे गेलं नव्हतं. राहुल गांधींनी द्वेष, सूड यावर उतारा म्हणून संपूर्ण देशाला प्रेमाचा किस दिला. जादू की झप्पी म्हणतो तसं जादू का फ्लाइंग किस. या ‘मोहोब्बत की दुकान’मधलं ते एक महत्त्वाचं शस्त्र आहे. भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींनी असे अनेक फ्लाइंग किस जनतेला, देशाला दिले आहेत. पण ज्यांना ममत्व उरलेलं नाही, त्यांना फ्लाइंग किस म्हणजे काय हे समजणार नाही’ असं म्हणत राऊत यांनी राहुल गांधींचे समर्थन केले आहे.