पिंपरी -पिंपरी विधानसभा मतदार संघातून 2019 मध्ये अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. मात्र, आमदार म्हणून निवडून आल्यापासून बनसोडे हे पक्षापासून फटकून राहत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता गेल्यापासून तर बनसोडे पक्षाचा मेळावा, बैठकांपासून दूर गेल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यांच्या पक्ष बदलाबाबतच्या चर्चाही सातत्याने सुरू असतानाच त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यामुळे त्यामध्ये भरच पडली आहे. त्यामुळे आमदार बनसोडे 2024 च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाणार की शिंदे गटात जाणार असे तर्क लढविले जात आहेत.
शहरात विधानसभेचे पिंपरी, चिंचवड, भोसरी असे तीन मतदारसंघ आहेत. त्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. 2009 च्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अण्णा बनसोडे विधानसभेत गेले. 2014 मध्ये मोदी लाटेत बनसोडे यांचा शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांनी पराभव केला. त्यानंतर पाच वर्षे बनसोडे राजकीय विजनवासात गेले होते. 2019 ची विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यावर ते पुन्हा सक्रीय झाले. राष्ट्रवादीच्या शहरातील काही नेत्यांच्या आग्रहामुळे बनसोडे यांना राष्ट्रवादीची पुन्हा उमेदवारी मिळाली. पक्षाची ताकद, बनसोडे यांचे नियोजन आणि पराभवातून मिळालेल्या अनुभवामुळे बनसोडे पुन्हा एकदा आमदार झाले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना बनसोडे पक्षाच्या नेत्यांसोबत अधून-मधून दिसत होते. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. विविध प्रश्नांवर आंदोलने केली. आमदार बनसोडे मात्र एकाही आंदोलनाला फिरकले नाहीत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ऑक्टोबरमध्ये बुथ आढावा बैठक घेतली. तेव्हाही बनसोडे तिकडे फिरकले नाहीत. दोनवेळा तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कार्यक्रमालाही पाठ फिरवली होती. नाराजीच्या चर्चेनंतर अजित पवार यांच्या गृहनिर्माण सोसायटीधारकांच्या समस्या जाणून घेण्याच्या संवादाला बनसोडे यांनी उपस्थिती लावली होती.
पक्षापेक्षा वेगळी भूमिका
शहरात सध्या चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. संपूर्ण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये ही निवडणूक लढविण्यावर एकमत आहे. त्याबाबतचा ठरावही पक्षाच्या शहरपातळीवरील समितीने करून तो राज्य पातळीवरील नेत्यांकडे पाठविला आहे. असे असतानाही बनसोडे यांनी मात्र चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे संघटन पातळीवर पक्षाची वाटचाल आणि बनसोडे यांची वाटचाल हे एकमेकांविरोधात सुरू असल्याचेही यावरून स्पष्ट झाले आहे.
शिंदे गटाच्या मार्गावर?
राष्ट्रवादीपासून चार हात अंतर ठेवून राहणारे आमदार बनसोडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मार्गावर आहेत की काय? अशी चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. आमदार बनसोडे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आणि दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला होता. आमदार बनसोडे हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. बनसोडे यांना पवार यांनी राजकीय ताकद दिल्याने बनसोडे हे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष आणि दोनदा आमदार झाले. बनसोडे यांच्या पक्षापासून लांब राहण्याच्या वृत्तीमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज असल्याचीही चर्चा रंगली आहे.