पिंपरी – चिंचवड विधानसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये कोणाला सुटणार याला पूर्णविराम मिळाला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसच या मतदारसंघामध्ये लढत देईल हे आज (दि.2) स्पष्ट झाले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीच इच्छुकांच्या मुलाखती घेत कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. येत्या सोमवारी (दि. 6) राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर होणार असून या मतदारसंघातील विजयाची जबाबदारी सुनील शेळके यांच्यावर सोपविल्याचे आज स्पष्ट झाले आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी चालविली आहे. महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे आपली तयारी चालविली असून कोणत्याही परिस्थितीत चिंचवडची निवडणूक लढवायचीच यावर या तीनही पक्षांचे एकमत आहे. मात्र, ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार याबाबत अद्यापपर्यंत घोषणा झालेली नाही. त्यामुळे तीनही पक्षांनी आपआपल्या पद्धतीने निवडणुकीची तयारी चालविली आहे.
चिंचवड विधानसभेमध्ये भाजपानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचीच मोठी ताकद असल्यामुळे या मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. शिवसेना आणि कॉंग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांशी त्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असले तरी अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ चारच दिवस शिल्लक राहिल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीच आता लक्ष घालत पुण्यामध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. राष्ट्रवादीकडून माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक राजेंद्र काटे, मयूर कलाटे, माजी नगरसेविका माया बारणे यांच्यासह आणखी काही इच्छुकांनी मुलाखती दिल्या.
प्रत्येकाशी स्वतंत्र संवाद साधल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर मंगला कदम यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी चिंचवडची निवडणूक जिंकायचीच या दृष्टीने कामा लागण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले. तिकीट कोणालाही दिले तरी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला. तसेच मावळचे आमदार सुनील शेळके यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आल्याने भाजपसाठी ही निवडणूक सोपी ठरणार नसल्याचेही अजित पवारांनी संदेश दिला आहे.
पक्षाच्या चिन्हावरच उमेदवार
चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये पक्षाचा चिन्हावरच उमेदवार उभा केला जाणार असल्याचे आज अजित पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीकडून 2019 प्रमाणे अपक्षाला पाठींबा दिला जाईल, अशी चर्चा मतदारसंघात सुरू होती, मात्र अजित पवार यांनी आज घेतलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी ही पोटनिवडणूक गांभिर्याने लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सोमवारी उमेदवाराची घोषणा
भाजपकडून या मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी साद घालण्यात आली होती, मात्र राष्ट्रवादीने पंढरपूरच्या पराभवाचे “उट्टे’ काढण्याचा निर्णय या निवडणुकीत घेतल्याचे पहावयास मिळत आहे. भाजपचा उमेदवार रविवारी अथवा सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर केला जाणार आहे. मंगळवार दि. 7 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्यामुळे सोमवारी (दि. 6) राष्ट्रवादीच्या उमेदवाराची महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.