पिंपरी – केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वकरिता 2 लाख 40 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे; तर रेल्वेच्या नवीन योजनांसाठी 75 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. परंतु पिंपरी-चिंचवडकर आणि मावळवासियांना यातील काही लाभ होऊ शकेल, अशी शक्यता कमीच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोणावळा ते पुणे या मार्गावरील ट्रॅक वाढविण्याची मागणी होत आहे आणि काही अर्थसंकल्पांमध्ये याबाबत तरतूदही करण्यात आली होती. परंतु मागण्या, घोषणा, तरतुदी आणि अहवाल यापुढे ट्रॅक विस्तारीकरणाचा विषय पुढे सरकलाच नाही.
सध्या बारा डब्यांची पुणे- लोणावळा लोकल दररोज सुमारे लाखभर प्रवाशांना घेऊन धावते. प्रवाशांची वाढती संख्या व त्यामुळे डब्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता नऊ डब्यांची लोकल बारा डब्यांची करण्याची तब्बल पंधरा वर्षांची मागणी काही वर्षांपूर्वी पूर्ण झाली. लोणावळादरम्यान आवश्यक असलेल्या लोहमार्ग चौपदरीकरणाची गेल्या 30 वर्षांपासून प्रवासी प्रतीक्षा करीत आहेत. तिसरा ट्रॅक सुरू करण्यासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, या ट्रॅकचेही काम अद्याप सुरू झालेले नाही.
दोनच ट्रॅक असल्याने एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य दिले जाते आणि यामुळे लोकलची संख्या आणि फेऱ्या वाढत नाहीत. पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच तळेगाव-लोणावळ्यापर्यंतच्या भागाचा होणारा विस्तार लक्षात घेता, या मार्गावर लोकल किंवा त्यांच्या फेऱ्या वाढविण्यासाठी गाड्यांचा वेग वाढविणे गरजेचे आहे.
पुणे विभागात लोकल सेवेला 11 मार्च 2023 रोजी 45 वर्षे पूर्ण होतील. पण या 45 वर्षात पुण्यात अजून 40 फेऱ्याच सुरू आहेत. नवीन लोकलची संख्या काहीच वाढवण्यात आलेली नाही. तसेच पुण्यासाठी लोकलचा एकही नवीन रेक मिळालेला नाही. या ट्रॅकवर लोकल व एक्सप्रेसच्या दिवसातून 124 फेऱ्या होतात. यामध्ये एक्प्रेसला प्राधान्य असताना लोकलच्या फेऱ्या कमी होतात. एखादा जरी ट्रॅक उपलब्ध झाला तरी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते.
परंतु ट्रॅक वाढविण्यासाठी जागेचा उपलब्धता नसल्यामुळे ट्रॅक वाढविण्यात अडचणी येत आहेत. तसेच हे ट्रॅक वळणावळणाचे असल्यामुळे लोकलला वेग पकडता येत नाही. घोरावाडी हे स्टेशन वर -खाली असल्यानेदेखील वेग कमी होत आहे. पिंपरी, चिंचवड,शिवाजीनगर, दापोडी रेल्वे स्टेशनजवळील रेल्वेच्या हद्दीतील झोपडपट्ट्यांचे स्थलांतर केल्यास त्याठिकाणी ट्रॅक टाकला जावू शकतो. तसेच कामशेत जवळील डोंगर पोखरला तरी त्याठिकाणी ट्रॅकसाठी जागा उपलब्ध होऊ शकेल.
हा मार्ग मात्र दुर्लक्षित
हायस्पीड ट्रेन, बुलेट ट्रेन आणि नवीन ट्रॅक तयार करण्यावर भर दिला जाणार असल्याचे यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरू असताना, पुणे-लोणावळा मार्गाचे चौपदरीकरण कायम दुर्लक्षित राहत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. गेल्या काही अर्थसंकल्पात यासाठी तरतूददेखील करण्यात आली होती. मात्र रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयाअभावी हा प्रकल्प अजूनही कागदोपत्रीच आहे. स्वतंत्र ट्रॅक झाल्यास लोकलची संख्या वाढून लोकल आणि एक्सप्रेस पण वेळेत धावतील.
पुणे-लोणावला मार्गाचे चौपदरीकरण हा अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. याबाबत आम्ही संघटनेच्या माध्यमातून शासनस्तरावर अनेकदा हा विषय मांडला आहे. मात्र, अद्यापही तो मार्गी लागलेला नाही.
-इक्बाल मुलानी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना