पिंपळे गुरव – भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आयोध्येतील नवनिर्मित मंदिरात 22 जानेवारी 2024 ला करण्यात येणार आहे. हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने जय्यत तयारी सुरू केली आहे. आयोध्येतून अक्षतांचे कलश पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाले आहेत. या कलशांचे पिंपळे गुरव येथील नागरिकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना संपर्क अभियानासाठी श्रीराम जन्मभूमी येथून आलेल्या कलशाचे पिंपळे गुरव येथील श्री तुळजा भवानी मंदिरात आगमन झाले. या वेळी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप आणि परिसरातील नागरिकांकडून कलशाचे पूजन करून श्री हनुमान मंदिर व पुढे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर येथे रामभक्तांच्या पूजनासाठी कलश ठेवण्यात आला. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने कलशाचे पूजन करून महाआरती करण्यात आली.
या वेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख धनंजय वांजरे, माजी नगरसेवक सागर अंगोळकर, माजी नगरसेविका उषा मुंढे, माजी स्वीकृत सदस्य महेश जगताप, समस्त गावकरी भजनी मंडळाचे अध्यक्ष जयराम देवकर, ह.भ.प. स्वप्नील महाराज कदम, लक्ष्मण पवार, मनोज ठाकूर, सोपानराव कुलकर्णी, शैलेश देशपांडे, मोहित गंधर्व, योगेश थोरात, शीतल चव्हाण, नरेश जगताप, रमेश काशीद, शशिकांत दुधारे यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.