पिंपरी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनीर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी पिंपरी येथील चौकातील पुतळा परिसरात भीमसैनिकांनी गर्दी केली होती. प्रत्येकजण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती प्रज्ज्वलीत करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करत होते. तसेच बाहेर रक्तदान शिबिर, वही-पेन संकलन करत होते. शहरातील बुद्ध विहारांमध्ये बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेच पिंपरी, एच. ए. कंपनी परिसर आणि दापोडीतील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.
पिंपरी, चिंचवड, दापोडी, सांगवी, निगडी, काळेवाडी, रावेत यांसह ठिकठिकाणच्या बुद्ध विहारांमध्ये सकाळी बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस स्मरण करून अभिवादन करण्यात आले. विहारांमध्येही समाज बांधवांनी सकाळपासून गर्दी केली होती.
पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या संख्येने समाजबांधवांनी गर्दी केली होती. अभिवादन करण्यासाठी येणाऱयांना वही-पेन दान केले. तसेच रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याची विक्री होत होती.
दापोडी येथील त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन महाविहारात जिल्हा रुग्णालय औंध यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात अभिवादन करण्यासाठी येणाऱयांनी रक्तदान करून प्रतिसाद दिला. विहारा धम्मचारी ऋताईन यांचे प्रवचन झाले. येथील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी मेणबत्ती प्रज्ज्वलीत करून अभिवादन करण्यात आले.