पिंपरी, दि. 11 (प्रतिनिधी) -पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात योगदान देणारा प्रत्येक व्यक्ती स्मार्ट सिटीच्या यशस्वी वाटचालीचा शिलेदार आहे. त्या ज्ञात-अज्ञात सर्वांप्रति आज महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त कृतज्ञता व्यक्त करतो, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 11 ऑक्टोबर हा स्थापना दिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. यानिमित्ता आमदार लांडगे यांनी मनपा मुख्यालयासमोरील स्व. अण्णासाहेब मगर पुतळ्यास पुष्पहार केला. यानंतर बोलताना आमदार लांडगे म्हणाले, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून पिंपरी चिंचवड औद्योगिक वसाहत विकसित झाली. नगरपालिकेचे रुपांतर महापालिकेत झाले. ज्ञानेश्वर लांडगे यांना पिंपरी-चिंचवडचे पहिले महापौर होण्याचा मान मिळाला. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात अमूल्य योगदान देणारे स्व. अण्णासाहेब मगर, स्व. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यासह भूमिपुत्रांनी शहराच्या विकासाची धुरा सक्षमपणे सांभाळली. तसेच, महापालिकेतील सर्व आजी-माजी अधिकारी, कर्मचारी यांनाही शहराच्या विकासाचे श्रेय द्यावे लागेल. हा विकासाचा आणि स्वाभीमानाचा वारसा आता नव्या पिढीला पुढे चालवण्याचे आव्हान सक्षमपणे पेलावे लागेल, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
आ. लांडगे म्हणाले की, औद्योगिक नगरी, कामगार नगरी, बेस्ट सिटी, एज्युकेशन हब, स्पोर्टस सिटी, स्मार्ट सिटी अशी वाटचाल शहराने करावी. त्यासाठी आम्ही सर्वजण सकारात्मक भूमिकेतून प्रयत्नशील आहोत. उद्योग-व्यापाराबरोबरच शिक्षण, कला, संस्कृती अशा सर्वच बाबतीत शहराची समृद्धी व्हावी, असेही लांडगे म्हणाले.