Vijay Vadettiwar| कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे उत्तर मध्य मुंबई मतदार संघातील उमेदवार उज्जवल निकम यांच्या विषयी बदनामीकारक वक्तव्ये केल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाने त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले वडेट्टीवार यांनी निकम यांना ‘देशद्रोही’ म्हटले होते. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात तत्कालीन महाराष्ट्र एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांचा अतिरेकी अजमल कसाबच्या गोळीने मृत्यू झाला नसल्याची माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. त्यावरून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
निवृत्त पोलीस अधिकारी एस.एम. मुश्रीफ यांनी लिहिलेल्या ‘हू किल्ड करकरे’ या पुस्तकाचा आधार घेत आपण हे आरोप केले होते, हे आपले वैयक्तीक आरोप नव्हते असे वडेट्टीवार यांचे म्हणणे आहे.
वडेट्टीवार यांची विधाने खोटी आणि वस्तुस्थितीवर आधारित नसल्याचा दावा करत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी निकम यांची बदनामी करणे आणि भावना भडकावण्याचा त्यांचा हेतू असल्याचा दावा केला. आम्ही भारतीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून वडेट्टीवार जे कॉंग्रेसचे स्टार प्रचारक आहेत त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे, असे शेलार म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेस नेत्याच्या या वक्तव्याचे समर्थन करतात का, असा सवालही शेलार यांनी केला आहे.