पिंपरी, दि. 11 (श्रीपाद शिंदे) – महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. मागील वर्षी सुरुवातीच्या आठ महिन्यांत महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांची संख्या 110 होती. ती संख्या यावर्षी 161 एवढी झाली आहे. तर मागील वर्षी सुरुवातीच्या आठ महिन्यात विनयभंग प्रकरणी 218 गुन्हे दाखल होते. ते यावर्षी 280 एवढे झाले आहे. महिलांवरील अत्याचारांसह बालकांवरील अत्याचाराच्या घटना देखील सातत्याने घडत आहेत. आठ महिन्यांत लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये 136 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामुळे त्या वाईट प्रवृत्तींना रोखण्याची गरज निर्माण झाली आहे.
जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांमध्ये पिंपरी चिंचवड शहरात 72 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले आहेत. तर 45 मुलींचा विनयभंग झाला आहे. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी 96 आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यांची उकल तात्काळ होत आहे. पण पालकांचे मुलांकडे होत असलेले दुर्लक्ष यासाठी मोठे कारण बनत आहे. गुन्हा घडल्यानंतर गुन्हा दाखल करणे, आरोपीला अटक करणे, त्याला न्यायालयात हजर करून शिक्षा होणे ही कायदेशीर प्रक्रिया होत असली तरी मुलांवर अत्याचार होऊ नये यासाठी पालकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
शाळा, कॉलेजातील मित्र, घराच्या परिसरात राहणारे तरुण, टवाळखोर यांच्याकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पालकांनी घराच्या परिसरातील वातावरण मुलींसाठी सुरक्षित आहे का, शाळा, कॉलेजातील वातावरणाबाबत शाळा व्यवस्थापन काळजी घेते का, या बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे. नुकत्याच वयात आलेल्या मुली, शारीरिक आकर्षण आणि कुतूहल असलेल्या मुली थोडीफार प्रलोभने आणि भूलथापांना बळी पडतात. आता आपण मोठे झालो आहेत, अशी भावना निर्माण होऊन त्या सुखी संसाराची स्वप्ने देखील रंगवू लागतात. इथेच त्यांची चूक होते. कुठलाही विचार न करता, घरच्यांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलणे महागात पडते.
लग्नाचे आमिष ठरतेय प्रमुख कारण
अनेक शाळकरी मुलींना त्यांच्यासोबत लग्न करतो, असे आमिष दाखवले जाते. शाळेतून कॉलेजच्या वातावरणात दाखल झालेल्या मुली अशा थापांना बळी पडतात. थोडीफार भौतिक सुखाची आश्वासने देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला जातो. लग्न करतो म्हणालेला मुलगा अचानक माघार घेतो आणि अल्पवयीन मुलगी मनानेही कोसळून जाते. अनेक प्रकरणांमध्ये मुली गरोदर झाल्यानंतर या गुन्ह्यांना वाचा फुटते आहे.
पोक्सो अंतर्गत दाखल गुन्हे
दर दोन दिवसाला एका मुलीवर अत्याचार
शहरात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत पॉक्सो अंतर्गत 136 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हे प्रमाण दर दोन दिवसाला एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे दाखवत आहे. अनेक प्रकरणांमध्ये मुलींचे खासगी व्हिडीओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊनही त्यांच्यावर अत्याचार होतात. तर लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याबाबत देखील काही गुन्हे दाखल झाले आहेत. अशा गुन्ह्यांची संख्या आठ महिन्यात 19 एवढी आहे.