“पुणे न्यायालयीन पॅटर्न’ इतर न्यायालयातही राबविण्याची गरज
– विजयकुमार कुलकर्णी
पुणे – शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रत्नागिरी, नागपूर कोर्टात करोनाचा शिरकाव झाला. मात्र, शिवाजीनगर न्यायालयात केलेले खबरदारीचे उपाय, वकील, पक्षकार घेत असलेली काळजी, गर्दी होऊ नये, शिस्त रहावी, यासाठी पुणे बार असोसिएशन बजावत असलेल्या चोख भूमिकेमुळे शिवाजीनगर कोर्ट सुरक्षित आहे. हा “पुणे न्यायालयीन पॅटर्न’ इतर न्यायालयात राबविल्यास प्रभावी ठरू शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यात पुकारलेल्या लॉकडाऊनपासून कोर्टाचे कामकाज बंद आहे. केवळ महत्त्वाच्या दाव्याची सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत सुनावणी होत होती. सुरूवातीला पक्षकार गर्दी करत होते. मात्र, काम असलेल्या पक्षकारांना प्रवेश देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली. बार असोसिएशनने काम असल्याशिवाय येऊ नका, असे पक्षकार आणि वकिलांना केलेल्या आवाहनामुळे गर्दी कमी झाली.
दरम्यान, 8 जूनपासून कोर्ट अंशत: सुरू झाले. निकालावर असलेले दावे, गुन्ह्यातून वगळण्याच्या, जामीन आणि रिमांडवर सुनावणी सुरू झाली. पहिल्या दिवशीच कोर्ट नियमित सुरू झाले म्हणून पक्षकारांनी गर्दी केली होती. पुणे बार असोसिएशनच्या पदाधिकारी, पोलीस यांनी ही गर्दी अटोक्यात आणली. दुसऱ्या दिवसापासून उद्या कोणते कोर्ट बसणार आहे, कोणत्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. याबाबतची माहिती आदल्यादिवशीच ऍपद्वारे देण्यात येऊ लागली. तेव्हापासून गर्दी अटोक्यात आली आहे. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुन्हा सकाळी 11 ते दुपारी 2 या एका सत्रात कामकाज सुरू झाले आहे. आता पुन्हा केवळ महत्त्वाच्या दाव्याची सुनावणी होत आहे. करोनाच्या संसर्गाच्या काळात शिवाजीनगर कोर्ट सुरक्षित आहे.
असा आहे पॅटर्न…
– न्यायालयात एकाच द्वारातून प्रवेश. थर्मलने तापमान तपासणी
– मास्कशिवाय न्यायालयात प्रवेश नाही
– कामासाठी संबंधित वकिलालाच प्रवेश
– कामाशिवाय पक्षकारांना प्रवेश नाही
– सॅनिटायझर दिले जाते, हात धुण्याची व्यवस्था
– प्रतिज्ञा पत्र करण्यासाठी वेगळी व्यवस्था
– बार रूम, कॅंटीन बंद ठेवले
– कामकाजानंतर आवारा बाहेर जाण्याचे आवाहन
वकिलांनी स्वत: काळजी घेतली पाहिजे. काम असल्याच न्यायालयात यावे. काम होताच त्वरित बाहेर निघून जावे. काम नसताना न्यायालयात सोडण्यासाठी आग्रह करू नये. पक्षकारांनीही गरज असेल तरच यावे. विनाकारण कोर्टात प्रवेश देण्याबाबत आग्रह करू नये.
– ऍड. सचिन हिंगणेकर, उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन