T20 World Cup 2024 & Sandeep Lamichhane – नेपाळमधील अमेरिकी दूतावासाने नेपाळचा फिरकी गोलंदाज संदीप लामिछानेला व्हिसा देण्यास नकार दिला आहे. लामिछानेची नुकतीच उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतर टी-20 विश्वकरंडकात तो संघाचा भाग असेल अशी अपेक्षा होती. एका आठवड्यापूर्वी, 23 वर्षीय लेग स्पिनरला अपील न्यायालयाने निर्दोष ठरवले होते, त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नेपाळ क्रिकेट बोर्डाला त्याचा विश्वचषक संघात समावेश करण्याची परवानगी दिली होती.
यावेळी 2 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वकरंडक होत आहे. आता अमेरिकन दूतावासाने व्हिसा न दिल्यामुळे त्याच्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याबाबत साशंकता आहे. याबाबतची माहिती संदीपनेच सोशल मीडियावर दिली आहे. तो म्हणाला, व्हिसा नाकारणे हे दुर्दैवी असून नेपाळ क्रिकेटचे भले व्हावे अशी इच्छा असलेल्या हितचिंतकांची आणि लोकांची मी माफी मागतो, असेही तो म्हणाला आहे.
And the @USEmbassyNepal did it again what they did back in 2019, they denied my Visa for the T-20 World Cup happening in USA and West Indies. Unfortunate. I am sorry to all the well wishers of Nepal Cricket. @USAmbNepal @CricketNep. https://t.co/xdBhaY6G91
— Sandeep Lamichhane (@Sandeep25) May 22, 2024
दरम्यान, आपला दुसरा T20 विश्वचषक खेळण्याच्या तयारीत असलेल्या नेपाळला दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश आणि नेदरलँडसह गट डी मध्ये ठेवण्यात आले आहे. लामिछानेच्या अनुपस्थितीत नेपाळने संघाची कमान फलंदाजी अष्टपैलू रोहित पौडेलकडे सोपवली आहे.
लामिछानेने 51 एकदिवसीय सामन्यांमध्ये 112 विकेट घेतल्या आहेत आणि टी -20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये 100 बळी घेण्याच्या जवळ आहे. त्याने आतापर्यंत 52 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 98 विकेट घेतल्या आहेत.
नेपाळ क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष बहादूर म्हणाले, ‘कायद्याने त्याला मुक्त केले आहे आणि आम्ही त्याच्यासाठी आनंदी आहोत. कनिष्ठ न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते, मात्र उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. आम्ही त्याच्यावरील बंदीही उठवली असून त्याला विश्वचषक संघात समाविष्ट करण्यासाठी आमच्याकडे 25 मे पर्यंत वेळ आहे.’ ते पुढे म्हणाले की, ‘मी निवड समितीशी बोलेन आणि आयसीसीला पत्रही लिहीन. तांत्रिक समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही त्याचा संघात समावेश करू. या बाबतीत मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे.’