T20 World Cup 2024 (India vs Pakistan Match Ticket) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) जूनमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक 2024 साठी पूर्णपणे तयार आहे. 2 जून ते 29 जून या कालावधीत वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा विश्वचषक खेळवला जाणार आहे. या कालावधीत न्यूयॉर्कमध्ये 8 सामने खेळवले जातील. ज्यामध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याचाही समावेश आहे.
खरेतर, राजकीय तणावामुळे 2012 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. तेव्हापासून हे दोन संघ फक्त आयसीसी स्पर्धा किंवा आशिया कपमध्ये नेहमीच आमनेसामने येत असतात. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्याची चाहत्यांमध्ये क्रेझ खूप वाढली आहे. मात्र या स्फोटक सामन्यापूर्वीच एक समस्या निर्माण झाली आहे. वास्तविक, तिकिटांच्या चढ्या किमतीवरून वाद सुरू झाला आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट सुमारे 16 लाख रुपयांना विकले जात असल्याचा दावा केला जात आहे. माजी आयपीएल कमिशनर ललित मोदी यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी तिकिटाच्या किमंतीवरून आयसीसीला चांगलेच फटकारले आहे.
IPL 2024 : मॅक्सवेलच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद, ‘या’ भारतीय खेळाडूंशी साधली बरोबरी…
आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी आयसीसीवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेत क्रिकेटला चालना देण्याऐवजी अधिकाधिक पैसे कमावण्यावर आयसीसी भर देत आहे. त्याचं म्हणणं आहे की, न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या मोठ्या सामन्याची तिकिटे $20,000 (₹16,65,138) पर्यंत विकली जात आहेत, तीही डायमंड क्लब सेक्शनची!
ललित मोदी यांनी एक्स (X) वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी काही स्क्रीनशॉट्स शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ” आयसीसी भारत-पाकिस्तान विश्वचषक सामन्यासाठी डायमंड क्लब सीटची तिकिटे $20,000 ला विकत आहे हे जाणून मला धक्का बसला.” पुढे त्यांनी म्हटले आहे की,”नफा कमावण्यासाठी नव्हे तर या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि चाहत्यांना जोडण्यासाठी हा विश्वचषक अमेरिकेत आयोजित केला जात आहे. 2750 डॉलर (सुमारे 2.28 लाख रुपये) मध्ये तिकीट विकणे म्हणजे क्रिकेट नाही. ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची फसवणूक (#notcricket #intlcouncilofcrooks) आहे.”
Shocked to learn that @ICC is selling tickets for Diamond Club at $20000 per seat for the #indvspak WC game. The WC in the US is for game expansion & fan engagement, not a means to make profits on gate collections. $2750 for a ticket It’s just #notcricket #intlcouncilofcrooks pic.twitter.com/lSuDrxHGaO
— Lalit Kumar Modi (@LalitKModi) May 22, 2024
अमेरिकेत होत असलेल्या विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची जोरदार चर्चा आहे. आयसीसी नुसार, या तिकिटांची किंमत सुरुवातीला $300 (आता विकली गेली) ते $10,000 दरम्यान होती. पण नुकत्याच आलेल्या यूएसए टुडेच्या अहवालानुसार ही तिकिटे आता आणखी जास्त किमतीत विकली जात आहेत.
सर्वात स्वस्त तिकीट किती आहे?
जर आपण आयसीसीची (ICC)अधिकृत वेबसाईट तपासली तर इथे काहीतरी वेगळेच दिसते. आयसीसीच्या वेबसाइटवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे तिकीट $300 पासून सुरू होते. म्हणजेच भारत-पाक सामन्याचे सर्वात स्वस्त तिकीट सुमारे 25 हजार रुपये आहे.
सर्वात महाग तिकीट आहे 8 लाखांचे…
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे सर्वात महागडे तिकीट 10 हजार डॉलर्सचे असल्याचे समजते. हे डायमंड क्लबचे तिकीट असेल. भारताच्या दृष्टीने बघितले तर या तिकिटाची किंमत 8 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल. पण 20 हजार डॉलर किमतीचे तिकीट आयसीसीच्या वेबसाइटवर दिसले नाही.
आयसीसीची (ICC) वेबसाइट पाहिली तेव्हा 70 टक्के तिकिटे (22 मे पर्यंत) विकली गेली होती, ज्याची किंमत दर्शविली गेली नाही. उपलब्ध तिकिटांमध्ये डायमंड श्रेणीच्या तिकिटाची किंमत 10 हजार डॉलर (सुमारे 8.32 लाख) देण्यात आली आहे. तर सर्वात कमी किमतीचे तिकीट $2750 (सुमारे 2.28 लाख रुपये) दाखवले गेले.