पिंपरी – निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेली प्रभाग रचना भाजपासाठी अनुकूलच आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपाचे पूर्वीपेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील. तसेच, तीन-चार ठिकाणी प्रभाग रचनेबाबत कायदेशीर हरकती घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असा दावा भाजपाच्या आजी-माजी शहराध्यक्षांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रारुप प्रभाग रचना मंगळवारी (दि. 1) प्रसिद्ध करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रभाग रचनेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती. याबाबत भाजपाचे विद्यमान शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमदार महेश लांडगे म्हणाले की, गतवेळी चार सदस्यीय प्रभाग पद्धती होती. त्यावेळी भाजपाला 77 जागा मिळाल्या होत्या.
आता तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार भाजपा गतवेळीपेक्षा जास्त जागा जिंकणार आहे. निवडणूक आयोग प्रशासनाकडून नियमाप्रमाणे प्रभाग रचना करण्यात आली आहे. तीन-चार ठिकाणी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी हस्तक्षेप करुन प्रभाग रचना असंवैधानिकपद्धतीने केल्याचे लक्षात आले आहे. याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेवून हरकती घेणार आहोत.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, गेल्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरासाठी विकासाच्या दृष्टीने भाजपाने चांगले काम केले आहे. भाजपाचे पदाधिकारी, संघटन आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. प्रत्येक प्रभागात दोन-तीन इच्छुक आणि प्रभावी उमेदवार केवळ भाजपाकडे आहेत. विरोधी पक्षाकडे अनेक प्रभागांमध्ये उमेदवारही नाही. त्यामुळे निश्चितपणाने भाजपा केलेल्या कामाच्या जोरावर चांगले यश मिळवणार आहे.
गतवेळीपेक्षा जास्त नगरसेवक विजयी होतील
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा कारभार हा निष्क्रीयतेचा आहे. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी गेल्या अडीच वर्षांत याचा अनुभव घेतला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत होणार आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका आम्ही गेल्या पाच वर्षांत शहरात ठेवली. याला मतदार समर्थन देतील आणि गेल्यावेळीपेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील, असा दावाही आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.
प्रभागरचना योग्यच केली असेल. जो जनतेसाठी काम करतो त्याला जनता सहकार्य करते. आम्ही मागील पाच वर्षांपासून शहराच्या विकासासाठी कार्य करत आहोत. प्रभागरचना करताना भौगोलिकदृष्ट्या चुकीच्या पद्धतीने वॉर्ड तोडले असले तरी जो काम करत आहे, त्याला काही फरक पडणार नाही. जनता त्यांच्या बाजूनेच उभी राहील. प्रत्येक पक्ष त्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे उमेदवार देतील.
– उषा (माई) ढोरे, महापौर पिंपरी चिंचवड.
सध्या करण्यात आलेली प्रारुप प्रभागरचना पूर्णतः समाधानकारक नाही. परंतु मागील पंचवार्षिकमध्ये करण्यात आलेल्या प्रभागरचनेपेक्षा खूपच चांगली आहे. मागील वेळी चार नगरसेवकांचा प्रभाग करण्यात आल्याने अडचणी आल्या त्या तुलनेत ठीक आहे. तरी सर्व प्रभागाचा अभ्यास करून काही बदल असतील तर हरकती नोंदविण्यात येतील. तसेच जोपर्यंत अरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत चित्र काही स्पष्ट होणार नाही.
– योगेश बहल, माजी महापौर राष्ट्रवादी.
महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना शिवसेनेसाठी फलदायी आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे किमान 30 नगरसेवक महापालिकेत असतील. ही प्रभागरचना शंभर टक्के शिवसेनेच्या हिताची आहे. महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याचा निर्णय वरिष्ठ घेतील. जर स्वतंत्र निवडणूक लढविण्याची वेळ आली तर तीस पेक्षा जास्त नगरसेवक शिवसेनेचे असतील, याबाबत आम्ही निश्चिंत आहोत.
– ऍड. सचिन भोसले, शहरप्रमुख शिवसेना, पिंपरी चिंचवड.