Asaduddin Owaisi On PM Modi | लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यानिमित्त देशभरात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा पार पडत आहे. एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी एका रॅलीत मुस्लिमांमधील लोकसंख्या वाढीबाबत पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर टीका केली. त्याचबरोबर “मुस्लिम सर्वात जास्त कंडोम वापरतात” असंही त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी?
हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भारतातील मुस्लिम पुरुष सर्वात जास्त कंडोम वापरतात आणि पंतप्रधान मोदी हिंदू समुदायामध्ये द्वेष पसरवण्यासाठी खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे.
ओवेसी यांनी जाहीर सभेत सांगितले की, “पंतप्रधान म्हणत आहेत की मुस्लिम जास्त मुले जन्माला घालतात. पण खुद्द पंतप्रधान मोदींच्या सरकारची आकडेवारी सांगते की, मुस्लिमांचा प्रजनन दर घसरला आहे, तरीही ते म्हणत आहेत की आम्ही जास्त मुले जन्माला घालत आहोत. भाजप आणि आरएसएस भारतात मुस्लिम बहुसंख्य होतील असा खोटा प्रचार करत आहेत.”
पुढे ओवेसी म्हणाले की, “भारतातील पुरुषांमध्ये जर कोणी सर्वात जास्त कंडोम वापरत असेल तर तो मुस्लिम आहे. हे मी म्हणत नाही. हेच सरकारी आकडेवारी सांगत आहे. नरेंद्र मोदी हिंदूंमध्ये मुस्लिम बहुसंख्य समाज बनतील अशी भीती निर्माण करत आहेत. किती दिवस तुम्ही मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करणार आहात. आमचा धर्म वेगळा आहे, पण आम्ही या देशाचे आहोत. तुम्ही द्वेषाची भिंत का उभी करत आहात? मुस्लीम जास्त मुले जन्माला घालतात ही भीती तुम्ही का निर्माण करत आहात?” असा सवालही ओवेसींनी केला आहे.
खरं तर, गेल्या आठवड्यात राजस्थानमधील बांसवाडा येथील रॅलीत पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्ष सत्तेत असल्यास मुस्लिमांना संपत्ती वाटपाला प्राधान्य देईल असा आरोप केला होता. पीएम मोदींच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. यानंतर काँग्रेसने पंतप्रधानांविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली होती.
हेही वाचा :