पिंपरी -राज्यात असलेल्या सत्तेचा गैरवापर करून भौगोलिक रचनेची लचकेतोड करण्यात आल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जाहीर झालेल्या प्रभाग रचनेमध्ये राज्यात सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीच्या दबावाखाली येऊन महापालिका आयुक्तांनी अनेक प्रभागाची लचकेतोड केली आहे. त्यांनी सत्तेचा गैरवापर करून हा प्रकार केला असला तरी भाजपाचे मागील पाच वर्षांमधील काम चांगले आहे.
त्यामुळे आम्ही महापालिका निवडणुकीत गतवेळीपेक्षा चांगले यश मिळवून शंभरी पार करू, असा दावाही ढाके यांनीयावेळी केला.प्रारूप प्रभागरचना करताना सत्तेचा गैरवापर करण्यात आला आहे. मात्र, भाजपाने पुढील 30 वर्षांच्या शहर विकासाचे व्हिजन समोर ठेवून काम सुरूठेवले आहे.
मागील पाच वर्षांत शहराच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या आहेत. विविध प्रकल्प उभारले आहेत. शहराची पाणीटंचाई दूर करण्यासाठी भामाआसखेड प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे. अशा विविध विकासकामांच्या जोरावरच शहरातील जनता भाजपाला पुन्हा संधी देईल. तसेच महापालिकेवर पुढील पंचावर्षीकमध्ये देखील भाजपाची सत्ता असेल, असेही ढाके म्हणाले.