वाकनवाडीच्या भगिनींचा भुईंज पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

पोल्ट्रीमुळे वाकनवाडीसह परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात माश्‍यांचा प्रादुर्भाव

भुईंज – वाकनवाडी गावालगत असणाऱ्या धनंजय बाळकृष्ण बाबर यांच्या मालकीची पोल्ट्री आहे. या पोल्ट्रीमधील सांडपाणी तसेच मृत कोंबड्यांमुळे वाकनवाडीसह परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात माश्‍यांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच परिसरात दुर्गंधी पसरल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी उपविभागी दंडाधिकाऱ्यांकडे आपले गाऱ्हाणे लेखी स्वरुपात मांडले होते.

या प्रकाराची गंभीर दखल घेऊन बाबर यांना पोल्ट्री व्यवसाय करण्यास मनाई करण्याचा आदेश 9 जुलै रोजी दिला आहे. मात्र अद्यापपर्यंत ही पोल्ट्री सुरुच आहे. शिवाय दंडाधिकाऱ्यांचा आदेश गावकऱ्यांपर्यंत तब्बल 40 दिवस उशिरा पोहचल्याने गावातील संतप्त महिलांनी आज सोमवारी भुईंज पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत जाब विचारला.

वाकनवाडी (ता. वाई) येथे गावालगत असणाऱ्या धनंजय बाळकृष्ण बाबर यांच्या मालकीच्या पोल्ट्रीफार्म मधील सांडपाणी तसेच मेलेल्या कोंबड्यांच्या दुर्गंधीमुळे निर्माण झालेल्या माशांमुळे वाकनवाडी गावच्या महिला, ग्रामस्थ, लहान मुले, वृद्ध नागरिक यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होऊन कित्येक लहान मुले व गावचे नागरिक अनेक आजारानां बळी पडले होते. याबाबत वाईचे उपविभागीय दंडाधिकारी यांचे समोर वाकनवाडी गावचे ग्रामस्थ यांनी व धनंजय बाळकृष्ण बाबर यांनी परस्पर विरोधी आपले म्हणणे मांडल्यानंतर गावकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने याची गंभीर दखल घेऊन सदर प्रतिवादी धनंजय बाळकृष्ण बाबर यांना सदर पोल्ट्री व्यवसायामुळे सार्वजनिक उपद्रव होऊ नये म्हणून पोल्ट्री व्यवसाय चालविण्यास मनाई करण्याचा आदेश 9 जुलै 2019 वाई येथील उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिला होता. परंतु या आदेशाबाबत वाकनवाडी ग्रामस्थांना ऑगस्ट रोजी ही माहिती देण्यात आली होती.

याबाबत वाकनवाडी ग्रामस्थांनी भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बुवा यांना विचारपूस केली असता कार्यवाही आजपासून चालू करतो, असे श्‍याम बुवा यांच्याकडून सांगण्यात आले होते. परंतु कोर्टाने दिलेला आदेश वाकनवाडी ग्रामस्थांना सांगायला 40 दिवसांचा अवधी का लागला. त्याचबरोबर आदेशानंतर ज्या मालकाच्या पोल्ट्री फार्ममुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता, त्या मालकावर काय कार्यवाही केली? याची विचारपूस करण्यासाठी सोमवार, 19 रोजी वाकनवाडी गावच्या समस्त रणरागिणी, अबाल वृद्ध व ग्रामस्थ यांनी धडक मोर्चा काढून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्‍याम बुवा यांना विचारणा केली. त्यावेळी श्‍याम बुवा यांनी या आदेशाबाबत आम्ही सदर मालक धनंजय बाळकृष्ण बाबर व पोलीस पाटील यांना नोटीस देऊन कार्यवाही केली आहे असे सांगण्यात आले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×