पुणे – शहरातील मध्यवर्ती रविवार पेठेसह मंडईतून दुचाकींची चोरी करणार्या सराईताला फरासखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणून १३ दुचाकी जप्त केल्या आहेत. मागील काही दिवसांपासून फरासखाना पोलिसांनी मिळविलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार त्याला जाळ्यात पकडण्यात आले आहे. उसनवारी भागविण्यासाठी तो दुचाकी चोरी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. खंडू दिलीप चौधरी ( २३, रा. निठूर, निलंगा, लातूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
रविवार पेठेसह मंडई परिसरातून दुचाकी चोरीचे प्र्रमाण वाढले होते. त्यापार्श्वभूमीवर परिसरातील सीसीटीव्हींचे फुटेज एकत्रित करून फरासखाना पोलिसांनी तपासाला गती दिली होती. तपासादरम्यान, सराईत वाहन चोर पुन्हा एकदा चोरी करण्यासाठी रविवार पेठेत आल्याची माहिती खबर्याने तपास पथकाला दिली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिसांसोबत झटापट करीत सराईत खंडू चौधरीने अंमलदाराचा चावा घेउन त्याला जखमी केले. त्यानंतर तो गर्दीचा फायदा घेउन पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीत त्याच्याकडून प्रथम एख दुचाकी हस्तगत करण्यात आली. यानंतर अधिक तपासात तब्बल १३ दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
या सर्व दुचाकी त्याच्या मुळ गावातून हस्तगत करण्यात आल्यां. ही कामगिरी अपर आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त संदीप सिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त रूक्मिीणी गलंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे , निरीक्षक अजित जाधव, सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड,
उपनिरीक्षक नीलेश मोकाशी,अंमलदार रिजवान जिनेडी, समिर माळवदकर, राकेश क्षीरसागर, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, सुमित खुट्टे, संदीप कांबळे, मेहबुब मोकाशी, प्रमोद मोहीते, गणेश आटोळे, शशीकांत ननावरे, तुषार खडके, अजित शिंदे यांच्या पथकाने केली आहे.
मिळेल त्या पैशात विक्री –
सराईत खंडू चौधरी हा निठूर गावातील रहिवाशी असून, व्यवसायाने न्हावी आहे. गावातील लोकांकडून तो उसने पैसे घेत होता. त्यानंतर उसनवारी फेडण्यासाठी तो पुण्यात येउन वाहन चोरी करू लागला. २०२१ पासून तो वाहन चोरी करीत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
मात्र, तो पोलिसांच्या नजरेत आला नव्हता. रविवार पेठेसह मंडईतून दुचाकी चोरल्यानंतर तो थेट गावात जात होता. त्यानंतर आठवड्याभरात एखाद्याकडून उसनवारी पैसे घेउन त्याला दुचाकी देत होता. पैशांचा ससेमिरा चुकविण्यासाठी तो दुचाकी मिळेल त्या पैशांच्या बदल्यात देत होता.