पाचगणीत ठेकेदाराकडून पर्यटकांची लूट

अनधिकृत अन्‌ नियमबाह्य पावत्यांद्वारे सुरू आहे फसवणूक

पाचगणी – पर्यटननगरी पाचगणी (ता. महाबळेश्‍वर) येथील पालिकेच्या वाहनतळ ठेकेदाराच्या अनधिकृत व नियमबाह्य पावत्यांद्वारे पर्यटकांची होत असणारी लुट होत असल्याचा प्रकार समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या पाचगणीचा पर्यटन हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणात पर्यटक स्वतःची वाहने घेऊन येत आहेत. परवा शॉपिंग सेंटर वाहनतळावर एका गाडीची चक्क 100 रुपयांची पावती घेतल्याने या प्रकाराचा भांडाफोड झाला. या कॉम्प्लेक्‍समधील व्यापाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी याबाबत आवाज उठवला.

पालिका नियमानुसार या ठेकेदाराने एका वाहनाकडून एक तासासाठी 10 रुपये आणि पुढील प्रत्येक तासासाठी 5 रुपये कर आकाराने क्रमप्राप्त असताना संबंधित ठेकेदाराने स्वतः 20 व 100 रुपयांच्या पावत्या तयार करून एक प्रकारे पर्यटकांची लूट चालवली आहे. तर या पावत्यावरील पालिकेचा शिक्काही पालिका देत नसून त्यांनी तो स्वतः बनवला असल्याने त्याचा इतर ठिकाणीही दुरुपयोग होऊ शकतो.

वाहनतळावरील ठेकेदारांचा गोलमाल लक्षात येताच पालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पर्यटकाना लुटणाऱ्या या ठेकेदारांची चौकशी होऊन अशा पद्धतीने लुटलेली रक्कम वसूल करून त्याच्यावर पालिकेची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल व्हावा व ठेका काढून घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि मुख्य रस्ते व बाजारपेठेतील पार्किंगचा ताण कमी व्हावा यासाठी नगरपालिकेने 1 नोव्हेंबर 2018 रोजी तीन वर्षासाठी सिराज लालमहम्मद शेख याना राजलक्ष्मी, पारशी पॉईंट आणि शॉपिंग सेंटर या तीन ठिकाणावरील पार्किंग कर गोळा करण्याचा ठेका दिला आहे. त्यातील नियमानुसार ठेकेदाराने पालिकेला एक दिवसाला 600 रुपये देणे असून महिन्याला 18,000 रुपये देण्याचे कार्य देशात नमूद आहे. तसेच स्थानिकांना 1200 रुपये मासिक व 14000 रुपये वार्षिक पास देण्याचा नियम आहे. या ठिकाणावरील स्वच्छताही या ठेकेदारानेच करावयाची आहे.

असे असताना पालिकेच्या नियमांना पायदळी तुडवून ठेकेदार प्रत्येक वाहनाकडून 10 रुपये ऐवजी 20 रुपये कसे घेतोय? पावतीवर पालिकेचा लोगो व नाव असताना पालिकेचा बनावट शिक्का बनवून तो का मारला जातोय? मोठ्या वाहनांना थेट 100 रुपयांची पावती कशी दिली जातेय? या सर्व प्रश्‍नांनी या ठेकेदाराचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे या ठेकेदारावर कायर कारवाई होणार याकडे पांचगणीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

संबंधित ठेकेदाराने केलेला हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. हा भ्रष्टाचार व पर्यटकांची लुबाडणूक करणाऱ्या ठेकेदाराला प्रशासनाने जर पाठीशी घातले तर आम्ही जनआंदोलन करू.

– शेखर कासुर्डे, माजी नगराध्यक्ष

सोशल मीडियावर या ठेकेदाराच्या तक्रारी वाढल्याने पालिकेने तातडीने त्याला नोटीस बजावली आहे. त्याचा खुलासा असमाधानकारक आल्यास व त्यामध्ये तो दोषी आढळल्यास त्याचा ठेका आम्ही रद्द करणार आहोत.

– अमिता दगडे पाटील, मुख्याधिकारी 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)