पुणे- पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून अपहरण करणाऱ्या आणि त्याला विकत घेणाऱ्यास बंडगार्डन पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली. या बालकाची विक्री दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावातील एकास तीन लाखाला करण्यात आली होती. त्याच्या ताब्यातून बालकाची सुखरुप सुटका करण्यात आली. मुख्य आरोपी फरार असून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
चंद्रशेखर मालकाप्पा नड्डगंड्डी ( २४, रा. जांबगी, जि. विजापूर, कर्नाटक), सुभाष पुतप्पा कांबळे ( ५५, रा. लवंगी, जि. सोलापूर) अशी आरोपींची नावे आहे. त्यांच्या ताब्यातून बालकाची सुखरुप सुटका करण्यात आली. अपहरणाची घटना शुक्रवारी (दि. २७) रोजी घडली होती. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
श्रावण अजय तेलंग(सात महिणे) असे अपहरण झालेल्या बालकाचे नाव होते. याप्रकरणी त्याचे वडील अजय तेलंग यांनी तक्रार दिली होती. अजय तेलंग यांची आई येरवडा कारागृहात आहे. तेलंग दाम्पत्य मूळचे यवतमाळचे आहे. आईला भेटण्यासाठी तेलंग आणि त्याची पत्नी पुण्यात आले होते. पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात तेलंग दाम्पत्य झोपले होते. त्यावेळी मुलगा श्रावण याला उचलून नेण्यात आले.
पोलिसांनी तातडीने तीन पथके तयार करुन पुणे स्टेशन परिसरातील ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले. यामध्ये गुन्ह्यात कारचा वापर आणि एकापेक्षा जास्त आरोपी असण्याची शक्यता दिसली. तर तांत्रिक विश्लेषणात आरोपी विजापूर (कर्नाटक) येथे गेल्याचे निष्पन्न झाले होते पोलिसांनी विजापूर येथे
सापळा रचून चंद्रशेखर नड्डगंड्डी याला ताब्यात घेतले नड्डगंड्डी याने गुन्ह्याची कबुली देत ४ साथीदारांच्या मदतीने पुणे स्थानकातून अपहरण केल्याचे सांगीतले तसेच बालक ३ लाख रुपयांना सुभाष कांबळेला विकलयाचे सांगितले. यानंतर पोलिसांनी विजापूर येथील एका हॉटेलमधून आरोपी सुभाष कांबळेला बालकासह ताब्यात घेतले.
अपघातात कुटुंबीय गमावल्याने वारसा पुढे चालवण्यासाठी बाळ विकत घेतले
बाळाला विकत घेणाऱ्या सुभाष कांबळेच्या कुटुंबातील बायको, मुलगा आणि सुनेचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.. त्यामुळे कुटुंबाचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांनी मुल दत्तक घेण्याचे ठरवले होते.
त्यानुसार ओळखीच्या काही तरुणांना त्यांनी अनाथ आश्रमातील मुल कुठे मिळू शकेल का ?अशी विचारणा केली होती. संबंधित आरोपींनी कांबळे याला सांगितले की, तुम्हास मूल मिळवून देतो , तीन लाख रुपये द्यावे लागतील. त्यानुसार सुभाष कांबळे याने आरोपींना काही रक्कम आगाऊ दिली होती.
बालकाचा शोध घेणाऱ्या बंड गार्डन पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रोख एक लाख रुपये बक्षिस देवुन पथकाचा गौरव केला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, उपआयुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सुर्वे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार,
पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत निबांळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सदिप मधाले, उप-निरीक्षक रविंद्र गावडे, उपनिरीक्षक चेतन धनवडे, पोलीस अंमलदार सुधीर घोटकुले, ज्ञानेश्वर बडे, सागर घोरपडे, मंगेश बोराडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजु धुलगुडे, विलास केकान यांचे पथकाने केली