मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भाजपच्या ट्विटर हॅण्डलवरन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या तीन सेकंदांच्या व्हिडीओवरून भाजपा-राष्ट्रवादीत ‘ट्विटरवॉर’ सुरु झाले आहे.
भाजपने शेअर केलेल्या या व्हिडीओत सुप्रिया सुळे,“आणि गद्दारी तर महा… महारा…महाराष्ट्राच्या रक्तातच”, भाषणाचा हाच भाग दोन वेळा जोडून ट्विटरवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओसह कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्राच्या तर रक्तात गद्दारी आहे” हे बोलून सुप्रिया ताई यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. भाजपाच्या या ट्वीटला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उत्तर दिले आहे.
भाजपने शेअर केलेल्या व्हिडिओवर राष्ट्रवादी काँग्रेसने,“असे अर्ध्यात काटछाट केलेले सहा सेकंदाचे व्हिडीओ टाकून जनतेची दिशाभूल करणे थांबवून हा पूर्ण व्हिडीओ भाजपाने ट्विटरवर टाकण्याची हिम्मत दाखवावी. असे फुकटचे एडिटिंग ॲप्स बाजारात रोज येत असतात!” असे म्हणत सडेतोड उत्तर दिले आहे.
सुप्रिया सुळे ५ जून रोजी इंदापूरमधील बोराटवाडी या गावच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी तिथल्या स्थानिकांशी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना त्या अडखळल्या. त्यातलाच तीन सेकंदांचा भाग दोन वेळा जोडून सहा सेकंदांचा व्हिडीओ ट्विटवर भाजपाने शेअर केला आहे.
यानंतर या भाषणाचा पूर्ण व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. यात सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गद्दारी करण्यासाठी आमदारांना भाजपाने प्रत्येकी ५० कोटी रुपये दिले. ४० आमदारांना प्रत्येकी ५० कोटी रुपये म्हणजेच २,००० कोटी रुपये दिले. २,००० कोटी रुपयांसाठी यांनी गद्दारी केली. आपलं सरकार पडलं नसतं आणि ते दोन हजार कोटी रुपये इंदापूरमध्ये आले असते तर तुमच्या आयुष्यात किती बदल झाला असता.
“महाराष्ट्राच्या तर रक्तात गद्दारी आहे” हे बोलून सुप्रिया ताई यांनी महाराष्ट्राचा अपमान केला. @supriya_sule #MaharashtraPolitics pic.twitter.com/ZvSi28ZN0w
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 13, 2023
सुप्रिया सुळे म्हणाल्या, दोन हजार कोटी रुपयांची त्यांनी घरं घेतली, गाड्या घेतल्या, बायकोला दागिने केले. आपल्या सरकारने मात्र या पैशात विकास केला असता, रस्ते बांधले असते, चांगल्या एसटी तुमच्या सेवेसाठी आणल्या असत्या, चांगल्या शाळा आणि आरोग्य केंद्र उभारली असती. यांनी २,००० कोटी रुपयांसाठी गद्दारी केली, गद्दारी तर महा..महारा..महाराष्ट्राच्या रक्तातच आहे, आणि हा आपला महाराष्ट्र आहे. मराठी माणसाचा…मराठी माणूस म्हणजे जो महाराष्ट्रात राहतो तो, पण यांनी गद्दारी केली आहे.
अर्ध्यात काटछाट केलेले सहा सेकंदाचे व्हिडीओ टाकून जनतेची दिशाभूल करण्याचा किळसवाणा प्रयत्न भाजपा करत आहे. हा घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे यांच्या भाषणाचा पूर्ण अंश असलेला व्हिडीओ..
गावाचे नाव बोराटवाडी, इंदापूर
गावभेट दौरा
तारीख 5 जून… pic.twitter.com/buGqFC2LUE— NCP (@NCPspeaks) June 14, 2023
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या शिंदे सरकारला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. बाळासाहेबांच्या इच्छेविरोधात हे शिंदे सरकार तयार झालं आहे. आपल्या राज्यात यशवंतराव चव्हाण होऊन गेले. हिमालयाला गरज पडेल तेव्हा सह्याद्री मदतीला धावून जाईल असं ते म्हणायचे. चीनने भारतावर आक्रमण केलं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी यशवंतरावांना बोलावून घेतलं, तेव्हा ते पहिल्यांदा केंद्रात मंत्री झाले. परंतु आत्ताच्या सरकारचं काय, तिकडे हिमालयाने डोळे वटारून पाहिलं की आपला सह्याद्री घाबरला. दिल्लीने हाक मारली के हे पळतंय तिकडे. यांच्या स्वाभिमानाला काय झालंय, असे त्या पूर्ण व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.