मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज 55 वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने मनसैनिक त्यांच्या निवासस्थानी पोहचले आहे. मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने देखील राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
प्राजक्ता माळीने राज ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो इनस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्राजक्ता राज ठाकरे यांना पुष्पगुच्छ देताना दिसते. या फोटोला प्राजक्ताने कॅप्शन दिले की, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष, मा. श्री. राजसाहेबांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा, इथून पुढील सर्वच वर्ष, खासकरून हे वर्ष आपल्या आयूष्यातील सर्वोत्कृष्ट वर्ष ठरो…’ प्राजक्ताच्या पोस्टवर कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, प्राजक्ता माळीच्या ‘प्राजक्तराज’ या ज्वेलरी ब्रँडच्या उद्घाटन सोहळ्याला राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत हजेरी लावली होती. प्राजक्ता याआधी ‘रान बाजार’ या मराठी वेब सिरीजमध्ये दिसली होती. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये सूत्रसंचालन करताना देखील दिसून येते.
मनसे कार्यकर्त्यांचा शुभेच्छांचा वर्षाव
राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील चाहते राज्यभरातून ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी दाखल झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी 55 किलोचा केक देखील आणला होता. काल रात्री 12 वाजल्यापासून राज ठाकरे यांच्या घरी कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती.